शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हंटली की आठवते ती प्रार्थना, संघाचे पथसंचलन, शाखेत होणारे खेळ व ध्वजाचा प्रणाम घेणारे स्वयंसेवक. परंतु, केवळ ही काही शाखेची ओळख होऊ शकेल काय? शाखा म्हंटल्यानंतर डोळ्यासमोर वरील बाबी तरळत असतिलही, परंतु शाखा ओळखली जाते ती त्या शाखेतील स्वयंसेवकांच्या चारित्र्यावरून व कार्यावरुन. शाखेत नियमीत जाणा-या स्वयंसेवकाच्या नेत्रपटलावर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी महापुरुषांची व राष्ट्रपुरुषांची चरित्रे व त्यांचे विचार तरळत असतात. शाखेत गेलं म्हणजे पाच मिनिटाच्या बोधकथेमध्ये ही महापुरुषांनी व राष्ट्रपुरुषांनी सांगितलेली मूलतत्वे व संघाचे संस्कार त्या स्वयंसेवकाच्या मन:पटलावर परिणाम करत असतात. त्याच हृदयाच्या पावन बागेमध्ये नंदनवन तयार होणं म्हणजे 'व्यक्ती निर्माण' होणं असतं. कारण याच नंदनवनातून परोपकाराची, मानवतेची, राष्ट्रीयत्वाची, देशसेवेची व समाजसेवेची फुले उमलतात व त्यांचा सुगंध समाजात स्वयंसेवकाच्या कार्यावरून व कर्तृत्वावरून दरवळत जातो. हा सुगंध कुण्या एका व्यक्तीचं नव्हे तर समस्त समाजाचं मन प्रफुल्लीत करण्यासाठी कारणीभूत ठरतो. समाज जर प्रफुल्लीत व चेतनायुक्त असेल तर कोणतेही राष्ट्र कधीही प्रगतीपासुन वंचित राहू शकणार नाही. म्हणुन राष्ट्राच्या प्रगतीचा विशाल वृक्ष होण्यासाठी एक कोंब व राष्ट्राला तेजोमय करणारा एक तेजकिरण संघाच्या शाखेतून स्वयंसेवकाच्या रुपातून बाहेर पडत असतो.
संघाच्या स्थापनेपासुन आतापर्यंत ९३ वर्षाच्या कालावधीत संघातुन वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्ती संघाने देशाला दिल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक आज सैन्यात दिसतील, क्रिडा क्षेत्रात दिसतिल, सामाजिक कार्य करणा-या अनेक संस्था संघटनांमध्ये दिसतील, सेवाकार्य करणा-या अनेक संस्थांमध्ये स्वयंसेवक आहेत, राजकिय नेत्यांमध्ये पंतप्रधान ते राष्ट्रपतींपासुन सरपंचापर्यंत संघाचे स्वयंसेवक दिसुन येतिल तसेच कला, विज्ञान, संशोधन व इतर अनेक क्षेत्रात स्वयंसेवकांचा समावेश आज दिसुन आल्याशिवाय राहत नाही. पण असे असताना संघाच्या शाखेतुन व्यक्तीनिर्माण कसे होते? या प्रश्नाविषयी अनेकांना जाणुन घ्यायची उत्सुकता असते. पण या प्रश्नाचे उत्तर मिळणे शाखेत गेल्यावाचुन समजणे अशक्य आहे. शाखा हा संघाचा आत्मा आहे. म्हणुन संघाच्या शाखेतुन होणारे व्यक्तीनिर्माण समजुन घेण्यासाठी संघाची एक तासाची शाखा समजुन घेतली पाहिजे.
शाखा लागण्याचा शिटी संकेत होताक्षणी गप्पागोष्टी, संघस्थान स्वच्छतेत वा अन्य काम करत असलेले स्वयंसेवक तात्काळ संघस्थानी गोळा होतात. मुख्यशिक्षकाच्या शिटी संकेताचे महत्व व शिस्त यावरुन लक्षात येऊ शकेल. शाखा लावणारा मुख्यशिक्षक हा शिशू, बाल किंवा तरुण असू शकतो. शाखेत शिशुपासुन ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत सर्व वयोगटातील स्वयंसेवक असतात. वैयक्तीक आयुष्यात त्यापैकी काहीजण डाॅक्टर असतिल, तर काही अधिकारी, काही प्राध्यापक तर काही शेतकरी. विविध क्षेत्रातील स्वयंसेवक शाखेत उपस्थित असतात. परंतु, एखादा गरीब घरातला व आपल्यापेक्षा वयाने लहाण असलेला बालक आपल्याला आज्ञा देतो याबद्दल कुणाच्या मनात कमीपणा येत नाही.
अग्रेसर म्हणुन पुढे जाताना स्वयंसेवक आपापसात न बोलता केवळ नजरानजर करुन काही क्षणात पुढे कोण जाणार, हे ठरवतात. त्यामध्ये स्वयंसेवकाचे वय, मान, प्रतिष्ठा, जातपात, श्रीमंती न बघता ज्याला कालपर्यंत संधी मिळाली नसेल व सगळ्यांमध्ये जो लहान आहे, त्यास संधी दिली जाते. यावरुन आपल्यापेक्षा लहाण असलेल्यांना, शोषित वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे हा संस्कार नकळत स्वयंसेवकांच्या मनावर घडत असतो.
तती सम्यक करताना व अग्रेसर सम्यक करताना स्वयंसेवक अतिशय सहजपणे एकमेकांना समांतर व सम्यक होतात. स्वयंसेवक स्वत: मागे-पुढे, डावीकडे-उजवीकडे सरकतात. अडून बसत नाही. यावरुन स्वयंसेवकांच्या मनात परिस्थितीशी जुळवून घेण्याची व तडजोड करण्याची वृत्ती निर्माण होते.
उपवीश: अशी आज्ञा आल्यानंतर सर्व स्वयंसेवक चटकन खाली बसतात. खाली बसायला आसन व चटयांची सोय नसते. मग कुणी किती मोठा व प्रतिष्ठेचा असला तरी तो सर्व स्वयंसेवकांप्रमाणे जमिनीवरच बसतो. त्याच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होत नाही. यातुन समान न्यायाचा संदेश त्याच्या अंतर्मनात संस्कार करत असतो.
शाखेत खेळल्या जाणा-या खेळातूनही असेच संस्कार स्वयंसेवकांवर होत असतात. किंबहुणा संस्कार करणारेच खेळ शाखेत खेळले जातात. बुद्धीला चालना मिळणारे बौद्धीक खेळ व शारीरीक व्यायाम करवुन घेणारे खेळांना शाखेत विशेष प्राधान्य असते. सामुहिक खेळातुन एकतेच्या व संघटनात्मक शक्तीचा संदेश दिला जातो. 'भुताची गल्ली' सारख्या खेळातून आपल्यातली भीती लोप पाऊन धाडस निर्माण होते. 'गावगूंड'सारख्या खेळातून सज्जनांना दुर्जनांच्या तावडीतून सोडवण्याची नकळत संदेश मिळत असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खेळ खेळल्याने स्वयंसेवकांमधले नैराश्य, हताशपणा, संकुचितपणा, दु:ख लोप पाऊन उत्साह व आनंदाचा संचार होतो. काही खेळातून आपत्ती ओढवल्यावर समाजाप्रती धाऊन जाण्याचा संस्कार होत असतो. संपूर्ण समाजाप्रति असीम आत्मीयतेचा संस्कार त्यावर होत असतो. म्हणुनच कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवा कार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.
असे म्हणतात, देशातील तरुणपीढीच्या ओठावर कोणते गीत आहे यावरुन त्या देशाचा वर्तमान ठरत असतो. संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांच्या ओठावर 'आम्ही गड्या डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणारं' असं स्फुर्ती गीत, 'न हो साथ कोई अकेले बढो तुम सफलता तुम्हाके कदम चूम लेगी' असे प्रेरणा गीत, 'जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, दिस दिस फैला तमस हटेगा' असे राष्ट्रजागृतीचा संदेश देणारे गीत तर आपणांस मिळालेले जीवन अमुल्य आहे, ते सन्मार्गाने व्यतित करण्याचा संदेश देणारे 'गलत मत कदम उठाओ सोचकर चलो विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो' असे गीत स्वयंसेवक सहज गुणगुणत असतात. ज्यामुळे त्यांच्या अंतर्मनावर संघ संस्कार घडत जातो. संघाच्या एक तासाच्या शाखेवर दररोज असे गीत म्हंटले जातात.
एक तासाच्या शाखेमध्ये खेळ खेळल्यानंतर बोधकथा, अमृतवचन व सुभाषित सांगितले जाते. ज्यामधून सुसंस्कृत व देशहिताचा विचार करण्यास प्रवृत्त करणारे विचार मांडले जातात. महापुरुषांचे व साधू-संतांचे विचार अमुतवचनातुन तर साधू संतांचे विचार व श्लोक सुभाषितातून धार्मिक संस्कार करत असतात. ज्यामुळे व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, परोपकार, सदाचारी वृत्ती निर्माण होते. शाखेच्या शेवटी होणारी संघाची प्रार्थना त्या स्वयंसेवकास आपण एक तासाची शाखा लावतो, म्हणजे नेमकं काय करतो? याची मीमांसा करत त्याचे स्वयंसेवक म्हणुन 'परम वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रम्' हे ध्येय त्याच्या मनावर कोरले जाते. हे ध्येय ज्याला कळलं तो त्याला योग्य वाटेल त्या दिशेने ध्येयपथाकडे वाटचाल करतो.
संघाचा संस्कार झालेली व्यक्ती मग राष्ट्र व समाजहितासाठी शक्य ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याविना राहत नाही.
संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघप्रारंभीच्या २५ वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला होता. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच सरमिसळ असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून, संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, १९५० पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. श्री गुरुजींनी विविध क्षेत्रात सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, क्रमशः त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज ३५ हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकार क्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रात केवळ सक्रियच नाही तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या तरी, स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत. तरीही कार्य मात्र संघाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन करत असतात. भारतमातेला परम वैभवास नेण्यासाठी झटत असतात. हा व्यक्तीनिर्माणाचा अविष्कार एक तासाच्या संघाच्या शाखेमुळे शक्य होत असतो.
©कल्पेश जोशी
lekhmrut.blogspot.com
No comments:
Post a Comment