Sunday 16 September 2018

..आणि त्याने डोळे उघडले

                                                                       ...आणि त्याने डोळे उघडले


सोयगांवात नुकतीच घडलेली सत्य घटना.

दिवसभर शेतीचे काम करुन सोनवणे कुटूंबीय झोपी गेले होते. घरात आई आपल्या लेकराला जवळ घेऊन झोपली होती. सर्वत्र शांतता पसरली होती व शांततेवर रात्रीने ताबा मिळवलेला होता. पंख्याची तेवढी घरघर चालू होती. तेवढ्यात शांततेला भंग करत सहा वर्षाच्या साईचा रडण्याचा आवाज आला. त्याचा रडणं ऐकुन आईला लगेच जाग आली. साई डोळे चोळत उठुन बसला होता व मोठ्यानेच रडू लागला. 'दादा, मला चावलं' असं कानाला हात लावत काहीसं बडबडत होता. मंद लाईटच्या प्रकाशातच आईने त्याच्या कानाला हात लावुन पाहिला. हाताला काहीतरी ओलसर स्पर्शाचा आभास त्या माऊलीला झाला. त्या मंद उजेडातच तिने आपली बोटांकडे नजर फिरवली. आपल्या बोटांना रक्त?? रक्तासारखे काही तरी आपल्या बोटावर दिसत असल्याची तिला जाणवले. साईच्या रडण्यामुळे घरातली सगळीच मंडळी जागी झाली. साईच्या दादांनी म्हणजेच वडिलांनी लाईटाचं बटन दाबलं. आणि पाहता तो काय? त्या माऊलीच्या बोटावर खरंच पुसटसे रक्त दिसत होते. आणि ते पाहुन सा-यांच्या हृदयाचे ठोके वाढले. भीतीने चेहरे ग्रासले. दादांनीही साईच्या कानाजवळ पाहिले. साईच्या कानावर रक्ताचे बारीक दोन थेंबं त्यांच्या दृष्टीस पडली. कश्याचे असावे? काळजीयुक्त चेह-यांवर प्रश्नचिन्ह पडले. आणि डोक्यात विचार आला. सर्पदंश..? डोक्यात प्रश्न तरळला आणि भीतीपोटी सगळ्यांनी अख्खे घर पिंजुन काढले. पण काहीच दिसले नाही. शेवटी काहीतरी किंडं किटकुल चावलं असावं असा विचार करुन पुन्हा सारे निश्चिंत होऊन झोपु लागले. साई अजुनही रडत होता. आई त्याला कुरवाळत झोपवत होती. त्याचं रडणं कमी झालं. घर पुन्हा शांत झाले. साईच्या आईचा डोळा लागत होता. तेवढ्यात तिच्या हाताला काहीतरी थंड स्पर्श झाला. तिने डोळे खडकन उघडले व उठुन बसत साईच्या वडिलांना मोठ्याने आवाज दिला. त्यांनी दरवाज्यातुन सरपटत जाणारा सर्प पाहिला. आणि लाईट लावेपर्यंत क्षणार्धात तो नाहिसा झाला.

आता मात्र घरातील सगळेच घाबरले. साईच्या वडिलांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. साईची प्रकृती अजुनही ठिक होती, तो रडत होता पण त्याचा चेहरा सामान्य नव्हता. साईला सर्पदंश झाल्याचे त्यांना आता मान्य करावे लागले.  आईला तर रडू कोसळले. आजीही रडू लागली. पित्यालाही धक्का बसला होता. पण रडून चालणार नव्हते. त्यांनी गल्लीतील शेजा-यांना तात्काळ उठवले. शेजारपाजारची मंडळी जमली. आणि साईला रात्री दोन वाजता सोयगांवच्या ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे सारेजण घेऊन निघाले. भैरवनाथाच्या धावा करत झपाझप पावलं टाकत सारेजण त्या काळोख्या रात्री मंदिरात पोहचले. भैरवनाथाचे दर्शन झाले. तेथिल रक्षा साईच्या कपाळी लावली व सगळे पुन्हा घाई घाईतच घरी परतले.

साईची प्रकृती खालावत चालली होती. वैद्यकिय उपचारासाठी गावातीलच सरकारी दवाखान्यात त्याला नेण्यात आले. त्याची नाजुक स्थिती पाहता स्थानिक डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले व लगेच जळगांवला एखाद्या चांगल्या क्रिटिकल केअर सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. अवघ्या दहा मिनिटात रुग्णवाहिका डाॅक्टरांसमवेत तेथे हजर झाली. आणि जळगांवचा प्रवास सुरु झाला.
दादा आपल्या साईला मांडीवर घेऊन बसले होते. आई सारखी देवाकडे प्रार्थना करत होती. एकेक सेकंद तासासमान भासत होता. गाडी पहुरपर्यंत पोहचली. साई मान सोडू लागला होता. विष वेगाने त्याच्या शरीरात पसरत होते. शिवाय कानाला सर्पदंश झाल्यामुळे मेंदूपर्यंत कमी वेळेत वीष पोहचण्याचा धोका होता. अश्या परिस्थितीत काळजीने व्याकुळ वडिल एकसारखे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. स्वत:चे मन समाधान करत होते. साई त्यांना होकार देत होता. गाडी नेरीजवळ पोहचली. तशी साईने मान सोडली. त्याला डोळेही उघडवेना झाले. वीषाने त्याच्या शरीरावर बराच कब्जा केला होता. पण वडिलांना अजुनही तो होकार देत होता. बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण पापण्या मात्र त्याने मिटल्या होत्या. एव्हाना रुग्णवाहिका जळगांवच्या सिव्हील हाॅस्पीटलजवळ येऊन थांबली होती. दवाखान्यात प्रवेश केला. डाॅक्टर भेटले. पण साईची नाजुक स्थिती पाहता त्यांनी त्याची शाश्वती घेता येणार नसल्याचे सांगितले. आम्ही सर्वतो प्रयत्न करु. पण तुम्हाला जर अन्य चांगल्या हाॅस्पीटलमध्ये न्यायचे असेल तर तुम्ही नेऊ शकता असा सल्लाही त्यांनी दिला. आता साईचे केवळ हृदयाचे ठोके चालू होते. वडिलांच्या आवाजाला त्याचा प्रतिसादही बंद झाला होता. सोबत आलेल्या गावकरी मित्रांनी तात्काळ मोबाईलवर काही नंबर फिरवले. जळगांवातील चांगल्यात चांगल्या क्रिटिकल केअर सेंटर्सना फोन लावले. अॅपेक्स हाॅस्पीटलच्या आयसीयु मध्ये जागा रिक्त होती. आणि क्षणाचाही विलंब न लावता साईला अॅपेक्समध्ये दाखल केले. इथेही डाॅक्टरांनी साईची गंभीर प्रकृती पाहुन त्यांना स्पष्ट केले की 'त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करु. तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. आता सारे त्याच्याच हाती आहे.' साईचा मृत्युशी संघर्ष चालूच होता.

गावात ही बातमी भल्या पहाटेच पसरली होती. सगळ्यांनाच काळजी वाटत होती. तिकडे डाॅक्टरांचे प्रयत्न सुरु होते व इकडे गावात सगळ्यांनी देवाजवळ प्रार्थना सुरु केली. कुणी जप जाप्य करत होतं, तर कुणी देव पाण्यात टाकले. कुणी गजानन बावन्नी घेत होतं, तर कुणी आपल्या कुलदैवतेपुढे साईसाठी पदर पसरत होतं. काही हितचिंतकांनी जळगांवच्या स्वामी समर्थ केंद्रातुन साईसाठी तिर्थ आणलं होतं. तिर्थाचे दोन थेंब त्याच्या जिभेवर टेकवले गेले. तथापी, साईचा प्रतिसाद पाहता डाॅक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले, अन् आतापर्यंत खंबीरपणे आपल्या लेकरासाठी तळमळत असलेल्या बापाच्या अश्रुचा बांध फुटला. मित्रांच्याही डोळ्यात पाणी आले. मित्र त्यांना धीर देत होते.

साई पुर्णपणे बेशुद्धावस्थेत होता. अॅडमीट करुन बारा तास झाले तरी त्याला शुद्ध येईना. डाॅक्टरांशी सारखी विचारपुस होत होती. 'शेवटी डाॅक्टरांनी पुढील चोवीस तास तुम्ही आम्हाला काहीच विचारु नका. आम्ही जे करता येईल ते करत आहोत. तुम्ही फक्त आता देवाजवळ प्रार्थना करा. मुलगा जगला वाचला तर ती देवाची कृपा' असे उदगार काढले. मनात शंका कुशंकांचे आधीच काहुर उठले होते. नको नको ते वाईट विचार येत होते. त्यात अजुन चिंता वाढली. काय होणार नि काय नाही काही कळत नव्हते.
साईला बेशुद्धावस्थेत जाऊन आता तीस तास होत आले होते. पण त्याला शुद्ध आली नव्हती की प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. पण डाॅक्टरांच्या ट्रीटमेंटला आता कुठेतरी यश येऊ लागले होते. कारण औषधांचा परिणाम रिपोर्टवर साफ दिसुन येत होता. त्यामुळे कुठेतरी आशेचा किरण दिसु लागला होता. डाॅक्टर त्याची केवळ शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. एकदा का तो शुद्धीवर आला की त्याचा अर्धा धोका टळला म्हणुन समजा. अश्यातच साईपर्यंत आवाजाच्या संवेदना पोहचतात का हे पाहण्यासाठी डाॅक्टरांनी त्याच्याशी गोड गोड बोलायला सुरुवात केली. नर्सेसही त्याच्याशी लाडीक स्वरात बोलत होत्या. 'आपल्याला फिरायला जायचंय, खाऊ खायचाय, आईसक्रिमही घ्यायचं मस्त मस्त' असं बोलत त्याच्या संवेदना व प्रतिसाद जाणुन घेण्यासाठी प्रयत्न मनापासुन करत होत्या. अश्यातच बोलता बोलता नर्सने त्याच्या वडिलांचे नाव उच्चारले न उच्चारले तोच त्याच्या बोटांची सुक्ष्म हालचाल झाली. बंद डोळ्याआड असलेल्या बुबुळांनी क्षणिक हालचाल केली. हे पाहुन नर्सला आनंदाश्चर्य वाटले. साई त्याच्या वडिलांना प्रतिसाद देतोय हे त्यांच्या लक्षात आले. नर्सने ताबडतोब त्याच्या वडिलांना बोलावुन घेतले.

जीवन मृत्युच्या लढाईतील आता अंतिम चरण सुरु होते. साईचे वडिल त्याच्या बेडजवळ सचिंत स्थितीत उभे होते. नर्सने त्यांना साईशी गोड गोड पण मोठ्याने बोलायला सांगितले. आयसीयु युनिटमधील सगळ्या पेशंटचेही लक्ष आता इकडेच लागुन होते. सगळे जणु जीव मुठीत घेऊन बसले होते. पुर्ण अवसान एकवटून त्या पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्यास हाक दिली.
"साई...बेटा ऊठ. आपल्याला घरी जायचंय ना?"

त्या बापाच्या कंठातून निघालेले स्वर अदृश्यपणे हवेत तरंगत त्या लेकराच्या कर्णातून वाहत जात थेट त्याच्या मस्तिष्कावर आदळले. आणि मंदिरांमध्ये होणा-या प्रार्थना जणु फळास आल्या. डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आले.

'साईने खाडकन डोळे उघडले!'

सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पित्याचा आवाज ऐकुन साईने आपले केवळ नेत्रच उघडले नव्हते, तर पुन्हा ही सृष्टी तो बघत होता. त्याचा जणु पुनर्जन्मच झाला होता. साश्रू नयनांनी तो बालक आपल्या पित्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातुन घळघळा अश्रु गळत होते. पित्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते. सर्वत्र आनंद पसरला होता. काळजीयुक्त काळवंडलेले चेहरे हर्षोल्हासाने व समाधानाने अक्षरश: उजळून निघाले.

पण डाॅक्टरांसमोर अजुनही एक यक्ष प्रश्न होताच. साईला शुद्ध आली होती. पण स्मृती??

विषाचा परिणाम जर मेंदुवर झाला असेल तर त्याची स्मृती जाण्याचा धोका होता. म्हणुन डाॅक्टरांनी परीक्षणासाठी त्यास विचारले, " साई, बाळा हे तुझे पप्पा आहेत ना?" त्यासरशी त्याने किंचित होकारार्थी मान हलवली. आणि हाही धोका टळल्याचे समाधान झाले. त्या माता पित्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

डाॅ. माजीद खान यांनी तर ही 'ईश्वरी कृपा' असल्याची प्रतिक्रिया दिली. तिकडे गावातही सर्व आप्तेष्टांना आनंद झाला.
पुढील दोन दिवसात साईची प्रकृती पुर्ववत झाली.
त्या पित्याने हर्षयुक्त नयनांनी डाॅक्टरांचे हात जोडून आभार मानले. आणि प्रेमळ मायेने पेशंटची सेवाभावे काळजी करणा-या व आपल्या गोडवाणीतून पेशंटचा अर्धा आजार पळवुन लावणा-या तेथिल नर्सेसचेही अनंत आभार मानले. विज्ञानाला अध्यात्माची व अध्यात्माला विज्ञानाची जोड असली म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले.


©कल्पेश गजानन जोशीlekhamrut.blogspot.com