Friday 18 January 2019

देशास पत्र

प्रिय भारत देश,

     पत्र लिहण्यास कारण की, मला तुझ्यावर होणा-या आघातांची व संकटांची वित्तंबातमी दररोज मिळत असते. घडणा-या गोष्टींमुळे तुला काय यातना होत असतिल याची जाणिवही आहे मला. रोज कुठे ना कुठे होणारे आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ व अधून मधून होणा-या जातीय दंगली यामुळे तू कायमच अस्वस्थ असतोस ह्याचीही कल्पना आहे. कधी कधी तर तमा न बाळगता तुझ्या नाशाच्या व तुझ्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याच्या आरोळ्या, किंकाळ्या व घोषणा ऐकू येतात त्यामुळे तुझ्या सन्मानाचा कडेलोट झाल्याचा आभास होतो. यामुळे मन विषण्ण होते.

     या सर्व प्रकारामुळे तू फार दु:खी होत असशिल हे ठाऊक आहे. म्हणुनच न राहवुन तुझ्या भूतकाळातील वैभवशाली रूपाची अतिशय आठवण येत आहे. ज्याप्रमाणे तुझ्या भौगोलीक रूपात कालानुरुप बदल होत गेला, तसाच बदल तुझ्या राजकिय - सांस्कृतिक रुपातही होत गेला. परंतु तू अमर आहेस, अटळ आहेस हे सिद्ध झाले आहे. तुझ्या पोटी नरवीर जन्मास आले. ज्यांनी तुझ्यावरील सर्व संकटांना पाताळात गाडून टाकले. आम्हा आजच्या तुझ्या लेकरांस तुझा फार पुर्वीचा इतिहास नाही माहित. पण, जसजशी आम्हास स्वर्णाक्षरात लिहिलेली, तुझ्या कौतुकाने पावन झालेली विविध ग्रंथसंपदा वाचावयास मिळते, तसतसे आम्ही तुझ्या गौरवाने व किर्तीने प्रभावित होतो.

    आम्हास वाचावयास मिळते ते 'रामायण'. ज्यामध्ये क्षत्रिय राजकुमाराने आपला पुत्रधर्म यथासांग पाळत मानवजातीस छळणा-या दुष्ट रावणाचा वध करून क्षत्रियधर्मही यशस्वीपणे पाळला. एक बाणी, एक पत्नी व एकवचनी अशी किर्ती असलेल्या श्रीरामचंद्राने आपल्या मातृभूवरील रावणरुपी संकट नष्ट करुन टाकले. आम्हास वाचावयास मिळतो महाभारत ग्रंथ. ज्यामध्ये पांडव-कौरवरुपातून साक्षात धर्म व अधर्माच्या युद्धात नेहमी धर्माचाच विजय होतो असा संदेश मिळाला. देशावरील अधर्माचे वाढते काळेकुट्ट मेघ दूर सारून श्रीकृष्णरुपी स्वच्छ निर्मळ सुर्यप्रकाशातून मानवजातीस नवसंजीवनी देण्यासाठी अर्जुनरुपी मानवास मिळालेला पवित्र गीता ग्रंथही ओघाने आठवतोच. एवढेच काय तर अगदी अडीच हजारवर्षापुर्वी या पुण्यभूवर मानवा मानवामध्ये संपत्ती व धनदौलतीच्या लालसेवरून, साम्राज्यवादावरून उठलेल्या रक्तपाताच्या प्रलयंकारी हिंसाचारांपासून भगवान बुद्ध व भगवान महावीरांसारख्या पुण्यात्म्यांनी सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला व या मातृभूवरील रक्ताच्या वाहणा-या नद्या नाहिश्या केल्या. मानवतेचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापीत झाले. सर्वदूर आनंद व सुखाचे वातावरण तयार झाले. हा गौरवशाली इतिहास जेव्हा आमच्या मन:पटलावर तरळू लागतो, तेव्हा तुझ्या अभिमानाने ऊर भरून येते.

     हे भारत देशा... पण आज तुझ्याकडे पाहून तू फार गहन चिंतेत असल्यासारखा का भासतो रे? मला माहितीये तुला कसल्या चिंतेने वेढले आहे? मला माहितीये तू असा निस्तेज का झाला आहेस? पण हे भारत देशा, तुझा तुझ्या लेकरांवर विश्वास राहिलेला नाही का रे? अरे ही श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व गौतम ही तर अगदी मोजकीच उदाहरणे आहेत बघ. पण या महात्म्यांसारखीच कित्येक महापुरुष व राष्ट्रपुरुष या भूमीवर जन्मास आले होते, त्यांची गणना कशी करावी? तू त्यांना विसरलास की काय? अरे... काळ्याभोर अवकाशातील चमकणा-या चांदण्या कधी मोजता आल्या आहेत काय? तुझ्या कुशीतसुद्धा अशीच अनंत वीररत्ने उपजली व निसर्गनियमाप्रमाणे कालवश झाली. पण त्यांच्या मुखी मरणपुर्व 'तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण' अशी अमरकाव्ये स्फुरली होती. अख्ख्या जगावर स्वत:चे राज्य प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने तुझ्या दिशेने एक वादळ घोंघावत येत होतं, तेव्हा पोरस व दस्युसारखी तुझी वीरपुत्र त्याचा कर्दनकाळ ठरली होती. तू हे भूललास तर नाही ना? तुझ्यावर झालेल्या परकिय आक्रमणात तक्षशिला व नालंदासारख्या तत्कालीन विद्यापीठातून रक्ताचं पाणी करुन लिहिलेली ग्रंथसंपदा परकिय नरपिशाच्चांनी जाळून भस्मसात करुन टाकली होती. पण म्हणुन तुझ्या पोटी जन्मलेल्या विद्वान पंडीतांची विद्वत्तता कधीच लुप्त होऊ शकली नाही. अरे...आम्हा मानवास आजकाल त्याचेदेखिल पुरावे लागतात, पण तू तर स्वत: ते अनुभवले आहेस. तेव्हा तू तरी त्या थोर विद्वानांचा अपमान होऊ देऊ नकोस. तुझ्यावर भलेही अनेक विध्वंसक धार्मिक आक्रमणं झाली असतिल, राजकिय आक्रमणं झाली असतिल. पण तुझ्या लाडक्या चंद्रगुप्ताने, राणासंगाने, महाराणा प्रतापाने, शिवाजीने व बाजीरावासारख्या महापराक्रमी वीर योद्धांनी आपल्या जीवाची बाजी लावुन त्या विषारी सर्पांपासून तुला मुक्ती दिलीच ना? मग आज का असा चेहरा पाडून बसला आहेस?

     हे भारत देशा, तुला एवढी चिंताग्रस्त व्हायची काही गरज नाही. आजच्या वाढत्या हिंसाचाराने, तुझ्याच लेकरातील आपसी भांडणांमुळे, जातीभेदामुळे व धार्मिक कटूतेमुळे तू व्यथीत झालेला असला तरी काळजी करु नकोस. ह्या समस्या सुद्धा जास्त काळ टिकणार नाहीत. खरं तर तू तुझा जगभरात वाढत चाललेला गौरव व किर्तीमूळे आनंदी व्हावयास हवे. जातीभेद व अस्पृश्यतासारख्या दुर्गूणांचा शेवट तेव्हाच व्हायला सुरुवात झाली होती, जेव्हा तुझा लाडका 'भीमराव' व 'ज्योतीबा' जन्मास आले होते. तुझी किर्ती अख्ख्या विश्वात उज्ज्वल व्हावी म्हणुन नव्वद वर्षापूर्वी एका महापुर्षाच्या डोक्यात अभिनव कल्पना सुचली होती व त्याने ती वास्तवात आणली. आज त्याच व्यक्तीच्या मस्तिष्कात फुललेल्या विचारांवर निस्वार्थी भावनेने राष्ट्रासाठी तन-मन-धनपुर्वक 'राष्ट्राय स्वाहा इदं न मम्' असे व्रत घेऊन सेवा अर्पण करण्यासाठी लाखो भारतीय स्वत:ची जात, धर्म, पंथ विसरून तुझ्याच सेवेत एकरूप होताहेत. हे तू डोळे उघडून पहावयास हवे. तुला त्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. 'अब्दूल कलाम' नामक तुझा असाच एक महाविद्वान सुपूत्र होऊन गेला ना? तू तर त्याला नक्कीच विसरला नसशिल. कारण त्यानेच तर तुला तुझ्या संरक्षणासाठी मोठाले क्षेपणास्त्रे तयार करुन दिलेत. तुझं नेतृत्व करणारा तो एक कुशल व यशस्वी राष्ट्रपती होऊन गेला. तुला परम वैभवाकडे वेगाने मार्गक्रमण करता यावं म्हणुन त्यानेच तुला 'अग्नीपंख' दिलेत. त्या अग्नीपंखात प्राण भरण्यासाठी आम्ही सारे भारतीय सदैव तत्पर आहोत हे विसरु नकोस. आम्हा भारतीयांमध्ये आपापसात काही मतभेद जरूर असतिल, पण राष्ट्रासाठी व राष्ट्रसंरक्षणासाठी आम्ही सारे भेदाभेद विसरुन एकरुप होतो, याचे का कमी दाखले आहेत?

     हे भारत देशा, केवळ तुझ्या वैभवासाठी आजपर्यंत अगणित वीरांनी व वीरांगणांनी आपल्या जीवाचे रान करुन प्रसंगी प्राण देऊन तुझी प्रतिष्ठा टिकवुन ठेवली आहे, ती पुढेही तशीच सदैव तेजोमय राहिल याची खात्री बाळग. तुझ्यासाठी हौतात्म्य पत्करलेली सर्व पुण्यात्मे वर दूर अवकाशात जाऊन चांदण्यांच्या रुपात विराजमान झाली आहेत. ती सारी तुला अवकाशातुन दररोज न्याहाळत असतात. तू जर असा हताश व निराश झालास, तर त्यांच्या काळजास घरे पडतील रे. तुझी आजची वैभव संपन्नता पाहून त्यांनाही तुझ्याकडे झेप घ्यावीशी वाटते. तुझ्या कुशीत येऊन उतरावे वाटते. त्यासाठी ते अजुनही मरणांत मरण पत्करतात व तुझ्याकडे प्रेमपुर्ण भावाने झेपावतात. चांदण रात्री जी तारे तुटताना दिसतात त्याचा अजुन काय अर्थ लावावा? तुझ्या प्रेमात व भक्तीत आम्ही सदैव तल्लीन असू याची खात्री बाळग. म्हणुन हे भारत देशा...तुझ्या येणा-या सुवर्णवैभवाला आलींगन देण्यासाठी प्रसन्न चित्ताने  सज्ज हो. आम्हास त्याच सुवर्ण क्षणांची आस लागुन आहे. भारता...सर्व बळ एकवटून तुझ्या गतवैभवाच्या सिंहासनाकडे भरारी घे व जगज्जेता हो.

                                          तुझा प्रिय,
                                            कल्पेश

lekhamrut.blogspot.com