Thursday 21 February 2019

जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर

जगभरात हिंदू धर्माचा प्रभाव वाढतोय- रवीजी अय्यर

१६ फेब्रुवारी, जळगांव: शनिवार रोजी जळगांवातील छ. संभाजी महाराज नाट्यगृहात 'हिंदूत्वाचा जगभरातील वाढता प्रभाव' या विषयावर रविकुमार अय्यर यांचे बौद्धिक ऐकण्याचा योग जळगांवकरांना आला. रविकुमार मागील काही वर्षापासुन जगभर हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीसंबंधी भ्रमंती करत आहेत. तसेच जनजाती समाजातही त्यांनी काही वर्ष सेवाकार्य केले असुन सध्या रा.स्व. संघाच्या केंद्रिय संपर्क मंडळातील ते सदस्य आहेत. या कार्यक्रमप्रसंगी त्यांचे 'इंडोनेशियातील हिंदुत्वाचे पुनरुत्थान' नामक पुस्तकाचे महेश त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले. सवलतीच्या दरात ते पुस्तक उपलब्ध करण्यात आले होते.

रविकुमार यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत केली. शिवरायांनी नेताजी पालकरांना स्वधर्मात पुन: घेऊन हिंदूंना शुद्धीबंदीच्या जोखडातून मुक्त केल्याचे त्यांनी म्हंटले. त्यामुळे हिंदू समाजावर शिवरायांचे अनंत उपकार आहेत व त्यांच्या या विचारांना आपण विसरता कामा नये असेही ते म्हणाले.

तसेच, मुळ विषयास सुरुवात करण्यापुर्वी जळगांव व खान्देशच्या वैशिष्ट्य असलेल्या सुवर्ण व्यापार व केळी उत्पादनाचा उल्लेख करत खान्देशचे खरे रत्न कवयित्री बहिणाबाई चौधरी आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. जळगांवच्या महापौर सौ. सिमा भोळे यांनी बहिणाबाईंविषयक एक पुस्तक भेट म्हणुन दिले, ते वाचुन बहिणाबाईंच्या कार्याचा खरोखर अभिमान वाटला. जळगांवच्या विद्यापीठाला त्यांचे नाव देऊन ख-या अर्थाने एका महिलेचा गौरव केला गेला असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठास महिलांचे नाव फक्त आपल्या भारतातच दिसू शकते. अन्य कोणत्याही देशात महिलेच्या नावाने विद्यापीठे नाहीत. त्यामुळे भारतातील स्त्रीसन्मानाचा आपणांस सार्थ अभिमान वाटतो असे ते यावेळी म्हणाले.

पुलवामा हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत ही घटना जरी सर्व भारतीयांसाठी दुखद असली तरी भारत महासत्ता होण्याकडे वेगाने पुढे जात आहे. भारताची पाकिस्तान व चीन सोबत युद्धे झाली आहेत. पण तत्कालीन परिस्थितीत आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत प्रभावी ठरत नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकिय दबावामुळे अनेकदा भारताला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आहे. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी पानबुडी पाठवली होती. आज तोच अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात व भारताच्या बाजूने उभा दिसत आहे. पुलवामा हल्ल्यापश्चात अमेरिकेसह रशिया व इस्त्राईलने भारताला पाठिंबा दर्शवलाय हे देशाच्या प्रगतीचे व वाढत्या शक्तीचे सुचिन्ह म्हंटले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

भारतावर मागील हजारो वर्षापासुन अनेक परकियांनी आक्रमण केले. अनेक परकिय भारतात आले व इथेच स्थायिक होऊन भारतीय संस्कृतीत मिसळून गेले. हिंदू संस्कृतीने त्यांना मोठ्या मनाने स्विकारले. परंतु इस्लामीक आक्रमणाबाबत असे घडले नाही. त्यामुळेच सिंध इस्लाममय होऊन गेला. त्यामुळे हिंदूंचे पुनरुत्थान होण्यासाठी त्या त्या प्रदेशातील परधर्मात गेलेल्यांना आपल्या स्वत्वाची भावना जागृत करुन द्यावी लागेल व मोठ्या मनाने त्यांना स्विकारावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

आपल्या देशाचे बौद्धीक वैभव परकियांनी चोरुन आपल्या नावावर खपवल्याचा दाखला देत त्यांनी लिनक्स व न्युटनच्या 'कॅलकुलस'च्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की काही वर्षापुर्वी न्युटन व लिनक्स यांच्यात कॅलकुलसच्या शोधावरुन वाद सुरु होता. लिनक्सच्या मृत्युनंतर न्युटनने ते आपल्या नावे केले. परंतु त्या दोघांच्याआधी कॅलक्युलसची निर्मिती कोणी केली हे कधी बाहेर आले नाही. त्याची निर्मिती आपल्या मराठवाड्यातील गणितज्ञ भास्कराचार्यांनी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच ब्रम्हेंद्रस्वामी 'फादर आॅफ कोआॅपरेटीव्ह मोमेंट' तर सारंगदेव संगितक्षेत्रातील महान तज्ञ असुन आपणांस त्यांच्या अलौकीक कार्याविषयी माहिती असली पाहिजे असे ते म्हणाले.

हिंदुत्वाविषयी बोलताना रविकुमारजी पुढे म्हणाले, आज जगभरात भारत व हिंदूत्वाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे व लोक वेगाने हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी अबुधाबीत हिंदू मंदिराचा शिलान्यास केला असुन त्यासाठी तेथिल मुस्लीम युवराज पुढाकार घेतो, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. पु. मुरारी बापु अबुधाबीत गेले तेव्हा तेथिल युवराजाच्या पत्नीने रामायण ग्रंथास आपल्या डोक्यावर ठेवून सभामंडपापर्यंत घेऊन गेल्या. तसेच तेथिल युवराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'जय सिया राम' म्हणुन केली होती याची आठवण त्यांनी यानेळी करुन दिली. त्यामुळे या उदाहरणांनरुन आपल्या लक्षात येईल की जगभरात हिंदूत्वाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. लोक धर्मांधता व कट्टरतापासून दूर जात आहे. लोकांना हिंदू धर्माचे व गीतेचे तत्वज्ञान जास्त तर्कशुद्ध व योग्य वाटत असल्यामुळे तसेच कट्टरतेच्या बेड्या नसल्यामुळे सर्व मानव जातीस आपला मानणारा व 'वसुधैव कुटुंबकम' असा मंत्र देणारा हिंदू धर्म आपलासा वाटू लागला आहे. रशियात आजपर्यंत ५ लाख लोकांनी हिंदू धर्म स्विकारला असुन त्यांना स्विकारण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी आपण सज्ज असले पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

इंडोनेशिया हा मुस्लीम देश असुनही तेथिल लोकांचा श्रीराम व रामायणावर प्रचंड विश्वास आहे. तेथिल लोक श्रीरामाची पुजा करतात. त्यांच्या चलनावर गणपतीचे चित्र असुन संस्कृत भाषेतील काही अक्षरे त्यांच्या चलनावर छापली असल्याचे त्यांनी सांगितले. जावा द्वीपावरही अशीच परिस्थिती आहे. आॅस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, इंडोनेशिया, जावा, रशिया इ. देशामध्ये हिंदू संस्कृतीचा स्विकार वेगाने होत असून त्यांना आपल्यात सामावुन घेण्यासाठी आपण उदार अंत:करणाने त्यांचे स्वागत करण्याची वेळ आली आहे. 

पुढील १५ ते २० वर्षात हेच प्रमाण अजुन वाढलेले असेल, त्यामुळे ही आपणा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. असे सांगुन त्यांनी आपल्या वाणीस विराम दिला.

हिंदू धर्माचा जगभरातील वाढता प्रभाव ऐकुन श्रोत्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता. हजारोंच्या संख्येने जळगांवकर या कार्यक्रमास उपस्थित होते. 

©️कल्पेश जोशी
lekhamrut.blogspot.com

Sunday 10 February 2019

शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र

             

                शाखा: व्यक्तीनिर्माणाचे केंद्र


     राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा म्हंटली की आठवते ती प्रार्थना, संघाचे पथसंचलन, शाखेत होणारे खेळ व ध्वजाचा प्रणाम घेणारे स्वयंसेवक. परंतु, केवळ ही काही शाखेची ओळख होऊ शकेल काय? शाखा म्हंटल्यानंतर डोळ्यासमोर वरील बाबी तरळत असतिलही, परंतु शाखा ओळखली जाते ती त्या शाखेतील स्वयंसेवकांच्या चारित्र्यावरून व कार्यावरुन. शाखेत नियमीत जाणा-या स्वयंसेवकाच्या नेत्रपटलावर देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी महापुरुषांची व राष्ट्रपुरुषांची चरित्रे व त्यांचे विचार तरळत असतात. शाखेत गेलं म्हणजे पाच मिनिटाच्या बोधकथेमध्ये ही महापुरुषांनी व राष्ट्रपुरुषांनी सांगितलेली मूलतत्वे व संघाचे संस्कार त्या स्वयंसेवकाच्या मन:पटलावर परिणाम करत असतात. त्याच हृदयाच्या पावन बागेमध्ये नंदनवन तयार होणं म्हणजे 'व्यक्ती निर्माण' होणं असतं. कारण याच नंदनवनातून परोपकाराची, मानवतेची, राष्ट्रीयत्वाची, देशसेवेची व समाजसेवेची फुले उमलतात व त्यांचा सुगंध समाजात स्वयंसेवकाच्या कार्यावरून व कर्तृत्वावरून दरवळत जातो. हा सुगंध कुण्या एका व्यक्तीचं नव्हे तर समस्त समाजाचं मन प्रफुल्लीत करण्यासाठी कारणीभूत ठरतो. समाज जर प्रफुल्लीत व चेतनायुक्त असेल तर कोणतेही राष्ट्र कधीही प्रगतीपासुन वंचित राहू शकणार नाही. म्हणुन राष्ट्राच्या प्रगतीचा विशाल वृक्ष होण्यासाठी एक कोंब व राष्ट्राला तेजोमय करणारा एक तेजकिरण संघाच्या शाखेतून स्वयंसेवकाच्या रुपातून बाहेर पडत असतो.



     संघाच्या स्थापनेपासुन आतापर्यंत ९३ वर्षाच्या कालावधीत संघातुन वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक दिग्गज व्यक्ती संघाने देशाला दिल्या आहेत. संघाचे स्वयंसेवक आज सैन्यात दिसतील, क्रिडा क्षेत्रात दिसतिल, सामाजिक कार्य करणा-या अनेक संस्था संघटनांमध्ये दिसतील, सेवाकार्य करणा-या अनेक संस्थांमध्ये स्वयंसेवक आहेत, राजकिय नेत्यांमध्ये पंतप्रधान ते राष्ट्रपतींपासुन सरपंचापर्यंत संघाचे स्वयंसेवक दिसुन येतिल तसेच कला, विज्ञान, संशोधन व इतर अनेक क्षेत्रात स्वयंसेवकांचा समावेश आज दिसुन आल्याशिवाय राहत नाही. पण असे असताना संघाच्या शाखेतुन व्यक्तीनिर्माण कसे होते? या प्रश्नाविषयी अनेकांना जाणुन घ्यायची उत्सुकता असते. पण या प्रश्नाचे उत्तर मिळणे शाखेत गेल्यावाचुन समजणे अशक्य आहे. शाखा हा संघाचा आत्मा आहे. म्हणुन संघाच्या शाखेतुन होणारे व्यक्तीनिर्माण समजुन घेण्यासाठी संघाची एक तासाची शाखा समजुन घेतली पाहिजे.

     शाखा लागण्याचा शिटी संकेत होताक्षणी गप्पागोष्टी, संघस्थान स्वच्छतेत वा अन्य काम करत असलेले स्वयंसेवक तात्काळ संघस्थानी गोळा होतात. मुख्यशिक्षकाच्या शिटी संकेताचे महत्व व शिस्त यावरुन लक्षात येऊ शकेल. शाखा लावणारा मुख्यशिक्षक हा शिशू, बाल किंवा तरुण असू शकतो. शाखेत शिशुपासुन ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत सर्व वयोगटातील स्वयंसेवक असतात. वैयक्तीक आयुष्यात त्यापैकी काहीजण डाॅक्टर असतिल, तर काही अधिकारी, काही प्राध्यापक तर काही शेतकरी. विविध क्षेत्रातील स्वयंसेवक शाखेत उपस्थित असतात. परंतु, एखादा गरीब घरातला व आपल्यापेक्षा वयाने लहाण असलेला बालक आपल्याला आज्ञा देतो याबद्दल कुणाच्या मनात कमीपणा येत नाही.

     अग्रेसर म्हणुन पुढे जाताना स्वयंसेवक आपापसात न बोलता केवळ नजरानजर करुन काही क्षणात पुढे कोण जाणार, हे ठरवतात. त्यामध्ये स्वयंसेवकाचे वय, मान, प्रतिष्ठा, जातपात, श्रीमंती न बघता ज्याला कालपर्यंत संधी मिळाली नसेल व सगळ्यांमध्ये जो लहान आहे, त्यास संधी दिली जाते. यावरुन आपल्यापेक्षा लहाण असलेल्यांना, शोषित वंचितांना पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे हा संस्कार नकळत स्वयंसेवकांच्या मनावर घडत असतो.

     तती सम्यक करताना व अग्रेसर सम्यक करताना स्वयंसेवक अतिशय सहजपणे एकमेकांना समांतर व सम्यक होतात. स्वयंसेवक स्वत: मागे-पुढे, डावीकडे-उजवीकडे सरकतात. अडून बसत नाही. यावरुन स्वयंसेवकांच्या मनात परिस्थितीशी जुळवून घेण्याची व तडजोड करण्याची वृत्ती निर्माण होते.

     उपवीश: अशी आज्ञा आल्यानंतर सर्व स्वयंसेवक चटकन खाली बसतात. खाली बसायला आसन व चटयांची सोय नसते. मग कुणी किती मोठा व प्रतिष्ठेचा असला तरी तो सर्व स्वयंसेवकांप्रमाणे जमिनीवरच बसतो. त्याच्या मनात वेगळेपणाची भावना निर्माण होत नाही. यातुन समान न्यायाचा संदेश त्याच्या अंतर्मनात संस्कार करत असतो.

     शाखेत खेळल्या जाणा-या खेळातूनही असेच संस्कार स्वयंसेवकांवर होत असतात. किंबहुणा संस्कार करणारेच खेळ शाखेत खेळले जातात. बुद्धीला चालना मिळणारे बौद्धीक खेळ व शारीरीक व्यायाम करवुन घेणारे खेळांना शाखेत विशेष प्राधान्य असते. सामुहिक खेळातुन एकतेच्या व संघटनात्मक शक्तीचा संदेश दिला जातो. 'भुताची गल्ली' सारख्या खेळातून आपल्यातली भीती लोप पाऊन धाडस निर्माण होते. 'गावगूंड'सारख्या खेळातून सज्जनांना दुर्जनांच्या तावडीतून सोडवण्याची नकळत संदेश मिळत असतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खेळ खेळल्याने स्वयंसेवकांमधले नैराश्य, हताशपणा, संकुचितपणा, दु:ख लोप पाऊन उत्साह व आनंदाचा संचार होतो. काही खेळातून आपत्ती ओढवल्यावर समाजाप्रती धाऊन जाण्याचा संस्कार होत असतो. संपूर्ण समाजाप्रति असीम आत्मीयतेचा संस्कार त्यावर होत असतो.  म्हणुनच कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकटांच्या वेळी स्वयंसेवक तत्परतेने सेवा कार्यात सहभागी होत राहिले आहेत. म्हणून RSS म्हणजे Ready for Selfless Service असे संघाचे वैचारिक विरोधकही मान्य करतात.





     असे म्हणतात, देशातील तरुणपीढीच्या ओठावर कोणते गीत आहे यावरुन त्या देशाचा वर्तमान ठरत असतो. संघाच्या शाखेतील स्वयंसेवकांच्या ओठावर 'आम्ही गड्या डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणारं' असं स्फुर्ती गीत, 'न हो साथ कोई अकेले बढो तुम सफलता तुम्हाके कदम चूम लेगी' असे प्रेरणा गीत, 'जिस दिन सोया राष्ट्र जगेगा, दिस दिस फैला तमस हटेगा' असे राष्ट्रजागृतीचा संदेश देणारे गीत तर आपणांस मिळालेले जीवन अमुल्य आहे, ते सन्मार्गाने व्यतित करण्याचा संदेश देणारे 'गलत मत कदम उठाओ सोचकर चलो विचार कर चलो, राह की मुसीबतों को पार कर चलो' असे गीत स्वयंसेवक सहज गुणगुणत असतात. ज्यामुळे त्यांच्या अंतर्मनावर संघ संस्कार घडत जातो. संघाच्या एक तासाच्या शाखेवर दररोज असे गीत म्हंटले जातात.

     एक तासाच्या शाखेमध्ये खेळ खेळल्यानंतर बोधकथा, अमृतवचन व सुभाषित सांगितले जाते. ज्यामधून सुसंस्कृत व देशहिताचा विचार करण्यास प्रवृत्त करणारे विचार मांडले जातात. महापुरुषांचे व साधू-संतांचे विचार अमुतवचनातुन तर साधू संतांचे विचार व श्लोक सुभाषितातून धार्मिक संस्कार करत असतात. ज्यामुळे व्यक्तीमध्ये सर्जनशीलता, परोपकार, सदाचारी वृत्ती निर्माण होते. शाखेच्या शेवटी होणारी संघाची प्रार्थना त्या स्वयंसेवकास आपण एक तासाची शाखा लावतो, म्हणजे नेमकं काय करतो? याची मीमांसा करत त्याचे स्वयंसेवक म्हणुन 'परम वैभवम् नेतुमेतत् स्वराष्ट्रम्' हे ध्येय त्याच्या मनावर कोरले जाते. हे ध्येय ज्याला कळलं तो त्याला योग्य वाटेल त्या दिशेने ध्येयपथाकडे वाटचाल करतो.
संघाचा संस्कार झालेली व्यक्ती मग राष्ट्र व समाजहितासाठी शक्य ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याविना राहत नाही.

     संघाची स्थापना १९२५ साली झाली. संघप्रारंभीच्या २५ वर्षांपर्यंत, केवळ संघटनेसाठी संघटन, संघटनेशिवाय दुसरे काहीही नाही, याचा आग्रह राहिला होता. परंतु, समाजाचे स्वरूप खूपच सरमिसळ असते. त्यात विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कलाकार, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, शिक्षातज्ज्ञ, सुरक्षा कर्मचारी, व्यापारी, इतर कर्मचारी अशा अनेक श्रेणी असतात. म्हणून, संघकार्यासाठी आवश्यक पाया तयार झाल्यावर, १९५० पासून संघाच्या योजनेनुसार स्वयंसेवक विविध क्षेत्रात जाऊन, समाजजीवनाच्या एका विशिष्ट क्षेत्रात राष्ट्रीय विचारांवर आधारित संघटन उभे करण्यासाठी जाऊ लागले. संघाचे क्रमश: विकसित (progressive unfoldment) होण्याचे हे पहिले चरण होते. श्री गुरुजींनी विविध क्षेत्रात सक्रिय झालेल्या या स्वयंसेवकांना, क्रमशः त्या क्षेत्रातील संघाचे गटनायक, राजदूत तसेच सेनापती म्हटले. आज ३५ हून अधिक संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवक शिक्षण, कृषी-शेतकरी, विद्यार्थी, श्रमिक-कामगार, इतिहास, कला, आर्थिक, क्रीडा, सहकार क्षेत्र, आरोग्य, वकील, विज्ञान, दिव्यांग, सेवा, सीमा सुरक्षा, सुरक्षा, वैचारिक इत्यादी अनेक क्षेत्रात केवळ सक्रियच नाही तर अग्रेसर आहेत. या सर्व संघटना एकाच राष्ट्रीय विचारांनी प्रेरित असल्या तरी, स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत. या संघटना संघाचा भाग किंवा शाखा नाहीत. तरीही कार्य मात्र संघाच्या संस्कारांनी प्रेरित होऊन करत असतात. भारतमातेला परम वैभवास नेण्यासाठी झटत असतात. हा व्यक्तीनिर्माणाचा अविष्कार एक तासाच्या संघाच्या शाखेमुळे शक्य होत असतो.

©कल्पेश जोशी
lekhmrut.blogspot.com

Friday 18 January 2019

देशास पत्र

प्रिय भारत देश,

     पत्र लिहण्यास कारण की, मला तुझ्यावर होणा-या आघातांची व संकटांची वित्तंबातमी दररोज मिळत असते. घडणा-या गोष्टींमुळे तुला काय यातना होत असतिल याची जाणिवही आहे मला. रोज कुठे ना कुठे होणारे आंदोलनं, मोर्चे, जाळपोळ व अधून मधून होणा-या जातीय दंगली यामुळे तू कायमच अस्वस्थ असतोस ह्याचीही कल्पना आहे. कधी कधी तर तमा न बाळगता तुझ्या नाशाच्या व तुझ्या अखंडत्वाला सुरुंग लावण्याच्या आरोळ्या, किंकाळ्या व घोषणा ऐकू येतात त्यामुळे तुझ्या सन्मानाचा कडेलोट झाल्याचा आभास होतो. यामुळे मन विषण्ण होते.

     या सर्व प्रकारामुळे तू फार दु:खी होत असशिल हे ठाऊक आहे. म्हणुनच न राहवुन तुझ्या भूतकाळातील वैभवशाली रूपाची अतिशय आठवण येत आहे. ज्याप्रमाणे तुझ्या भौगोलीक रूपात कालानुरुप बदल होत गेला, तसाच बदल तुझ्या राजकिय - सांस्कृतिक रुपातही होत गेला. परंतु तू अमर आहेस, अटळ आहेस हे सिद्ध झाले आहे. तुझ्या पोटी नरवीर जन्मास आले. ज्यांनी तुझ्यावरील सर्व संकटांना पाताळात गाडून टाकले. आम्हा आजच्या तुझ्या लेकरांस तुझा फार पुर्वीचा इतिहास नाही माहित. पण, जसजशी आम्हास स्वर्णाक्षरात लिहिलेली, तुझ्या कौतुकाने पावन झालेली विविध ग्रंथसंपदा वाचावयास मिळते, तसतसे आम्ही तुझ्या गौरवाने व किर्तीने प्रभावित होतो.

    आम्हास वाचावयास मिळते ते 'रामायण'. ज्यामध्ये क्षत्रिय राजकुमाराने आपला पुत्रधर्म यथासांग पाळत मानवजातीस छळणा-या दुष्ट रावणाचा वध करून क्षत्रियधर्मही यशस्वीपणे पाळला. एक बाणी, एक पत्नी व एकवचनी अशी किर्ती असलेल्या श्रीरामचंद्राने आपल्या मातृभूवरील रावणरुपी संकट नष्ट करुन टाकले. आम्हास वाचावयास मिळतो महाभारत ग्रंथ. ज्यामध्ये पांडव-कौरवरुपातून साक्षात धर्म व अधर्माच्या युद्धात नेहमी धर्माचाच विजय होतो असा संदेश मिळाला. देशावरील अधर्माचे वाढते काळेकुट्ट मेघ दूर सारून श्रीकृष्णरुपी स्वच्छ निर्मळ सुर्यप्रकाशातून मानवजातीस नवसंजीवनी देण्यासाठी अर्जुनरुपी मानवास मिळालेला पवित्र गीता ग्रंथही ओघाने आठवतोच. एवढेच काय तर अगदी अडीच हजारवर्षापुर्वी या पुण्यभूवर मानवा मानवामध्ये संपत्ती व धनदौलतीच्या लालसेवरून, साम्राज्यवादावरून उठलेल्या रक्तपाताच्या प्रलयंकारी हिंसाचारांपासून भगवान बुद्ध व भगवान महावीरांसारख्या पुण्यात्म्यांनी सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवला व या मातृभूवरील रक्ताच्या वाहणा-या नद्या नाहिश्या केल्या. मानवतेचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापीत झाले. सर्वदूर आनंद व सुखाचे वातावरण तयार झाले. हा गौरवशाली इतिहास जेव्हा आमच्या मन:पटलावर तरळू लागतो, तेव्हा तुझ्या अभिमानाने ऊर भरून येते.

     हे भारत देशा... पण आज तुझ्याकडे पाहून तू फार गहन चिंतेत असल्यासारखा का भासतो रे? मला माहितीये तुला कसल्या चिंतेने वेढले आहे? मला माहितीये तू असा निस्तेज का झाला आहेस? पण हे भारत देशा, तुझा तुझ्या लेकरांवर विश्वास राहिलेला नाही का रे? अरे ही श्रीराम, श्रीकृष्ण, महावीर व गौतम ही तर अगदी मोजकीच उदाहरणे आहेत बघ. पण या महात्म्यांसारखीच कित्येक महापुरुष व राष्ट्रपुरुष या भूमीवर जन्मास आले होते, त्यांची गणना कशी करावी? तू त्यांना विसरलास की काय? अरे... काळ्याभोर अवकाशातील चमकणा-या चांदण्या कधी मोजता आल्या आहेत काय? तुझ्या कुशीतसुद्धा अशीच अनंत वीररत्ने उपजली व निसर्गनियमाप्रमाणे कालवश झाली. पण त्यांच्या मुखी मरणपुर्व 'तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण' अशी अमरकाव्ये स्फुरली होती. अख्ख्या जगावर स्वत:चे राज्य प्रस्थापीत करण्याच्या उद्देशाने तुझ्या दिशेने एक वादळ घोंघावत येत होतं, तेव्हा पोरस व दस्युसारखी तुझी वीरपुत्र त्याचा कर्दनकाळ ठरली होती. तू हे भूललास तर नाही ना? तुझ्यावर झालेल्या परकिय आक्रमणात तक्षशिला व नालंदासारख्या तत्कालीन विद्यापीठातून रक्ताचं पाणी करुन लिहिलेली ग्रंथसंपदा परकिय नरपिशाच्चांनी जाळून भस्मसात करुन टाकली होती. पण म्हणुन तुझ्या पोटी जन्मलेल्या विद्वान पंडीतांची विद्वत्तता कधीच लुप्त होऊ शकली नाही. अरे...आम्हा मानवास आजकाल त्याचेदेखिल पुरावे लागतात, पण तू तर स्वत: ते अनुभवले आहेस. तेव्हा तू तरी त्या थोर विद्वानांचा अपमान होऊ देऊ नकोस. तुझ्यावर भलेही अनेक विध्वंसक धार्मिक आक्रमणं झाली असतिल, राजकिय आक्रमणं झाली असतिल. पण तुझ्या लाडक्या चंद्रगुप्ताने, राणासंगाने, महाराणा प्रतापाने, शिवाजीने व बाजीरावासारख्या महापराक्रमी वीर योद्धांनी आपल्या जीवाची बाजी लावुन त्या विषारी सर्पांपासून तुला मुक्ती दिलीच ना? मग आज का असा चेहरा पाडून बसला आहेस?

     हे भारत देशा, तुला एवढी चिंताग्रस्त व्हायची काही गरज नाही. आजच्या वाढत्या हिंसाचाराने, तुझ्याच लेकरातील आपसी भांडणांमुळे, जातीभेदामुळे व धार्मिक कटूतेमुळे तू व्यथीत झालेला असला तरी काळजी करु नकोस. ह्या समस्या सुद्धा जास्त काळ टिकणार नाहीत. खरं तर तू तुझा जगभरात वाढत चाललेला गौरव व किर्तीमूळे आनंदी व्हावयास हवे. जातीभेद व अस्पृश्यतासारख्या दुर्गूणांचा शेवट तेव्हाच व्हायला सुरुवात झाली होती, जेव्हा तुझा लाडका 'भीमराव' व 'ज्योतीबा' जन्मास आले होते. तुझी किर्ती अख्ख्या विश्वात उज्ज्वल व्हावी म्हणुन नव्वद वर्षापूर्वी एका महापुर्षाच्या डोक्यात अभिनव कल्पना सुचली होती व त्याने ती वास्तवात आणली. आज त्याच व्यक्तीच्या मस्तिष्कात फुललेल्या विचारांवर निस्वार्थी भावनेने राष्ट्रासाठी तन-मन-धनपुर्वक 'राष्ट्राय स्वाहा इदं न मम्' असे व्रत घेऊन सेवा अर्पण करण्यासाठी लाखो भारतीय स्वत:ची जात, धर्म, पंथ विसरून तुझ्याच सेवेत एकरूप होताहेत. हे तू डोळे उघडून पहावयास हवे. तुला त्या सर्वांचा सार्थ अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. 'अब्दूल कलाम' नामक तुझा असाच एक महाविद्वान सुपूत्र होऊन गेला ना? तू तर त्याला नक्कीच विसरला नसशिल. कारण त्यानेच तर तुला तुझ्या संरक्षणासाठी मोठाले क्षेपणास्त्रे तयार करुन दिलेत. तुझं नेतृत्व करणारा तो एक कुशल व यशस्वी राष्ट्रपती होऊन गेला. तुला परम वैभवाकडे वेगाने मार्गक्रमण करता यावं म्हणुन त्यानेच तुला 'अग्नीपंख' दिलेत. त्या अग्नीपंखात प्राण भरण्यासाठी आम्ही सारे भारतीय सदैव तत्पर आहोत हे विसरु नकोस. आम्हा भारतीयांमध्ये आपापसात काही मतभेद जरूर असतिल, पण राष्ट्रासाठी व राष्ट्रसंरक्षणासाठी आम्ही सारे भेदाभेद विसरुन एकरुप होतो, याचे का कमी दाखले आहेत?

     हे भारत देशा, केवळ तुझ्या वैभवासाठी आजपर्यंत अगणित वीरांनी व वीरांगणांनी आपल्या जीवाचे रान करुन प्रसंगी प्राण देऊन तुझी प्रतिष्ठा टिकवुन ठेवली आहे, ती पुढेही तशीच सदैव तेजोमय राहिल याची खात्री बाळग. तुझ्यासाठी हौतात्म्य पत्करलेली सर्व पुण्यात्मे वर दूर अवकाशात जाऊन चांदण्यांच्या रुपात विराजमान झाली आहेत. ती सारी तुला अवकाशातुन दररोज न्याहाळत असतात. तू जर असा हताश व निराश झालास, तर त्यांच्या काळजास घरे पडतील रे. तुझी आजची वैभव संपन्नता पाहून त्यांनाही तुझ्याकडे झेप घ्यावीशी वाटते. तुझ्या कुशीत येऊन उतरावे वाटते. त्यासाठी ते अजुनही मरणांत मरण पत्करतात व तुझ्याकडे प्रेमपुर्ण भावाने झेपावतात. चांदण रात्री जी तारे तुटताना दिसतात त्याचा अजुन काय अर्थ लावावा? तुझ्या प्रेमात व भक्तीत आम्ही सदैव तल्लीन असू याची खात्री बाळग. म्हणुन हे भारत देशा...तुझ्या येणा-या सुवर्णवैभवाला आलींगन देण्यासाठी प्रसन्न चित्ताने  सज्ज हो. आम्हास त्याच सुवर्ण क्षणांची आस लागुन आहे. भारता...सर्व बळ एकवटून तुझ्या गतवैभवाच्या सिंहासनाकडे भरारी घे व जगज्जेता हो.

                                          तुझा प्रिय,
                                            कल्पेश

lekhamrut.blogspot.com

Saturday 27 October 2018

विजयादशमी

विजयादशमी उत्सव:
पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे नागपुर रेशीमबागेतील भाषण

दि. १८ आॅक्टोबर, गुरुवार रोजी देशभरात विजया दशमी उत्सवाच्या प्रसंगी रा. स्व. संघाचा संपुर्ण देशभरात पथसंचलन व शस्त्रपुजनाचा कार्यक्रम पार पडला. नागपुरच्या रेशीमबागेतील नागपुर महानगराच्या उत्सव प्रसंगी पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केवळ रेशिमबागेतील उपस्थितांसाठीच नव्हे, तर देशभरातील स्वयंसेवकांसाठी व नागरीकांसाठी उद्बोधनपर व्याख्यान दिले. तत्प्रसंगी नोबेल पुरस्कार विजेते श्री. कैलास सत्यार्थी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच के.जे. अल्फान्स, सिनियर डायरेक्टर स्टाफ सौदी अरबचे अन्वरजी अली, आळंदीचे राणोजी महाराज, विक्रमजी चुना, अरुणाचल प्रदेशातील 'भारत मेरा घर' उपक्रमातील बंधूभगिनी व पद्मश्री, संगित नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त उस्ताद रशीद खान आपली पत्नी सोहा खान यांच्यासह अतिथी म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस घोष, व्यायामयोग व दंडाचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. त्यानंतर महानगर संघचालकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विजयादशमी उत्सवाचे व शस्त्रपुजनाचे महत्व थोडक्यात सांगितले व आलेल्या सर्व अतिथी व नागरीकांचे सहृदय स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथी असलेल्या श्री कैलास सत्यार्थी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन करत भारताचे वैशिष्ट्य सांगतांना संवेदनशील भारत, समावेशी भारत, स्वावलंबी भारत, स्वाभीमानी भारत व सुरक्षीत भारत हे पंचामृत तत्व मांडले.

कार्यक्रमाचा समारोप पु. सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांच्या उदबोधनपर भाषणाने झाला. त्यावेळेस ते बोलत होते. "भारतातील लोकांच्या काही कमतरतांमुळे देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी राज्य केले. समाज आपल्या मुळ मार्गापासुन दूरावत गेला. परंतु श्री गुरुनानक यांनी पुन: आपल्या संस्कारातुन देशाला धर्माचरणाचा योग्य मार्ग दाखविला. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी दोन हात केले व सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली स्वत:ची देशरक्षणासाठी विदेशी भूमीवर सेना तयार करत इंग्रजांना घाम फोडला होता. जालीयनवाला बागेत इंग्रज आपल्या सोबत काय व्यवहार करतिल, हे माहित असतानासुद्धा तिथे जाऊन इंग्रज सरकारच्या मुजोरपणाविरोधात आवाज उठवला व झालेल्या हत्याकांडात हौतात्म्य पत्करले. अध्यात्मिक शक्तीमुळे देशात अश्या अनेक घटना घडल्या ज्यामुळे परकियांना देश सोडण्यास भाग पडले." असे मत डाॅ. भागवत यांनी मांडले.

आजही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या सत्ता बदलतात किंवा कायम राहतात. परंतु, त्यांच्याकडून भारताला असलेला धोका कायम असतो. सत्ता बदलल्या म्हणुन देशाचे वर्तन बदलत नसते. नाहीतर जम्मू कश्मीरसह सीमावर्ती भागात होणारे शस्त्रसंधी उल्लंघन व गोळीबार थांबला असता. म्हणुनच आपणांस देशरक्षणार्थ सदैव तत्पर राहण्याची गरज आहे. शत्रुवर आपला दबदबा कायम राखण्यासाठी आपल्याला सदैव बलसंपन्न रहावं लागेल. जेणेकरून शत्रुची भारताकडे पाहण्याची हिंमत होणार नाही." असे मत मांडत डाॅ. भागवतांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

देशरक्षणासाठी भारताचे वीर जवान सीमेवर आपल्या कुटूंबापासून दूर रात्रंदिवस पहारा देत असतात. ते जवान त्यांचे कर्तव्य पार पाडताना कमी पडत नाही. पण एक नागरीक म्हणुन आपण आपले कर्तव्य का विसरतो? जवानांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घ्यावयास हवी व त्यांना शक्य ती मदत आपण केली पाहिजे. स्वत:च्या वैयक्तीक व कौटुंबीक कर्तव्यांशिवाय एक भारतीय म्हणुन असलेल्या कर्तव्यांचा समाजाला विसर कधीपासुन विसर पडू लागला? भारतीय समाजाने देश सरकारला कधीपासुन सोपवला? जे काही करायचे ते सरकारनेच, असा पायंडा पडत चालला आहे जो देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. ज्या परिवाराने आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी सीमेवर पाठवली त्या परिवाराच्या प्रत्येक सुख दु:खात समाजाने मनापासुन सहभाग घेतला पाहिजे. समाजकर्तव्याची जाणिव करुन देणारा असा संदेशही डाॅ. भागवतांनी त्यावेळी दिला.

भारताला प्रचंड मोठी सागरी सीमा लाभली आहे. पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रात शेकडो लहानमोठे द्वीप आहेत. ज्यांच्यावर आपले कायम लक्ष असले पाहिजे व त्यांचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी केला पाहिजे. भारताची वाढती शक्ती पाहता काही देश भारताविरोधात शेजारील लहानमोठ्या देशात आपले प्रस्थ जमवत आहेत. त्या अनुषंगाने भारताने सदैव कटीबद्ध राहुन सागरी सीमा अधिक सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे सांगत चीनपासुन देशाला असलेला धोका विषद केला.
भारताने आता नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करून स्वावलंबी व्हावयास हवे. शस्त्रांसाठी दुस-या देशांवर निर्भर राहण्यापेक्षा आपण स्वयंपुर्ण कसे होऊ याचा विचार झाला पाहिजे. स्वावलंबनताच देशाला आता जास्त सुरक्षित करु शकेल असे मत त्यांनी मांडले 

देशाला बाह्यशक्तींपासुन जसा धोका आहे तसाच अंतर्गत शक्तींपासुनही आहे. आंतरिक सुरक्षेस धोका निर्माण करणा-यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. तसेच त्यांना समर्थन करणा-यांचे कारणे शोधुन त्यावरही उपाय केला गेला पाहिजे. देशातील वंचित, शोषित व पीडितांना काही वाईट शक्तींकडून भडकवले जात आहे. या पीडितांचा वापर केवळ स्वत:चा स्वार्थ पुर्ण करण्यासाठी केला जात आहे. पीडित लोकांचे अश्या कामात देशविरोधी शक्तींना मदत करण्याचं कारण समजुन घ्यायला पाहिजे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचतो का? यावर विचार झाला पाहिजे. देशविरोधी घोषणा देणा-या व बंदूकीच्या जोरावर क्रांती आणू पाहणा-यांना गरीब, दिन दलितांची व वनवासी बांधवांची काळजी कधीपासुन वाटू लागली? देशात आंतरीक सुरक्षेला आव्हान देणा-या घटना वाढत आहेत व त्यांचे करते करविते भारताबाहेर इटली, पाकिस्तान व अमेरिकेसारख्या देशात असणे अनेक शंका निर्माण करतात. ते देशवासीयांनी वेळीच ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.

आज सगळीकडे शहरी नक्षलवादावर चर्चा सुरु असतात. पण शहरी नक्षलवाद काल परवा जन्माला आला नसुन त्याची सुरुवात मागील ब-याच वर्षापासुन सुरु होती. सरकार कोणतेही असो पण त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या व नागरीकांच्या सुचनांचा विचार वेळीच केला तर भविष्यातील नक्षलवादासारख्या असुरी शक्ती डोके वर काढू शकणार नाही. छोट्या छोट्या संघटनांमार्फत, आंदोलनांमार्फत विद्यार्थ्यांना भडकावण्याचे माओवादी काम निरंतर चालू असते. विदेशात भारताची सतत निंदा करणारे देशातही 'भारत तेरे टुकडे होंगे' अश्या घोषणा देतात. हे एक प्रकारे मानसशास्त्रीय युद्ध चालू आहे. ज्याचं विद्रुप रूप दहा वीस वर्षानंतर दिसू लागते. म्हणुन भारतीयांनी सदैव सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे डाॅ. मोहनजी भागवत सांगत होते.

गरीब आदीवासी समाजाच्या मुलभूत गरजा पुर्ण झाल्यास ते देशविरोधी शक्तींना बळी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशाची आंतरीक सुरक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक करुन त्यांच्या योगक्षेमाचा विचार झाला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री कैलास सत्यार्थींनी स्वयंसेवकांना बाल व बालिकांवर होणा-या अत्याचाराविरोधात काम करण्याच्या केलेल्या आवाहनास आपल्या वाणीतून समाधानकारक उत्तर देताना मोहनजींनी स्वयंसेवक आपापल्या कार्यक्षेत्रात सदैव मदत करतील असा विश्वास व्यक्त केला.

बाल अत्याचार वाढत चाललेल्या परिस्थितीवर बोलताना डाॅ. मोहनजी भागवत म्हणाले, "बालकांवर आपल्या घरातुनच चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. आजकाल बालकांना चांगले संदेश मिळणा-या बोधकथा सांगणे फार कमी झाले आहे. नवीन पीढीस सुसंस्कार, सदविचार देणे महत्वाचे आहे. हातातील मोबाईल फोन केवळ यंत्र आहे, त्याचा सदुपयोग कसा करावा हे केवळ त्या वापरकर्त्याच्या संस्कारावर अवलंबुन आहे. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार कमी करायचे असतिल तर केवळ कायदे करुन चालणार नाही, तर समाजमन बदलणे जास्त आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले."

देशाची अखंडता व सार्वभौमता टिकुन राहण्यासाठी 'बंधूता' फार महत्वाची आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान समर्पित करताना बंधूतेच्या तत्वाचे महत्व पटवुन दिले आहे. देशातील बंधूतेला तडा गेला म्हणजे देशविरोधी शक्तींचे फावते. तसे न होऊ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या बंधुत्वाचा विसर पडता कामा नये. असे झाल्यास कितीही मोठी देशविरोधी शक्ती देशाचं काही बिघडवू शकणार नाही असा विश्वास डाॅ. भागवतांनी व्यक्त केला.

काळानुरुप होणारे परिवर्तन समाजाने स्विकार केलेले पाहिजे. नाहीतर समाजात अशांती व अस्थिरता निर्माण होते, हे केरळच्या शबरीमाला मंदिराच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन डाॅ. भागवतांनी पटवुन दिले. न्यायालयाने दिलेला निर्णय स्त्री-पुरुष समानता जोपासणारा आहे. पण लाखो लोकांची श्रद्धा काय आहे, याचा विचार न करता हा निर्णय दिला. म्हणुन वाद निर्माण झाला. न्यायाच्या संबंधित बाबी जश्या न्यायालयाद्वारा न्यायसंमत होतात, त्याचप्रमाणे धर्माच्या बाबतीत असलेल्या बाबी धर्मगुरु किंवा आचार्यांकडून धर्मसंमत होतात. न्यायालयाद्वारे शबरीमालाचा निर्णय समाजावर थोपवला गेला म्हणुनच केरळमध्ये अशांती निर्माण झाली आहे. प्रबोधन करुन जोपर्यंत समाजमन बदलत नाही तोपर्यंत असे धाडसी निर्णय अस्थिरता व अशांतीला निमंत्रण देणारे ठरतात. असे मत डाॅ. मोहनजी भागवतांनी मांडले.

देशातील सर्वात संवेदनशील मुद्द्यापैकी एक असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, "बाबर एक आक्रमक होता. त्याला भारतातील हिंदू व मुसलमानांविषयी प्रेम व स्नेह नव्हते. भारताला लुटण्यासाठीच तो जर चालुन आला होता, तर त्याच्या आठवणीचं प्रतिक असलेल्या बाबरी मशिदला का जपावे? आता तर सिद्ध झाले आहे की तिथे पुर्वी मंदिरच होते व मंदिर पाडून मशिद उभारली गेली होती. परंतु काही लोकांना मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आहे, त्यामुळे ते काही ना काही कारण पुढे करत वेळ मारुन नेतात. देशातील हिंदु समाज कित्येक वर्षापासुन भव्य राममंदिर तयार होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाचे सहयोगी संघटन म्हणुन आमची इच्छा आहे की सरकारने कायदा बनवुन अयोध्येत भव्य राममंदिर त्वरीत उभारावं."

मतदान व नोटाविषयी बोलताना डाॅ. भागवत म्हणाले की मतदानाचा अधिकार म्हणजे जनतेला मिळालेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जनता मतदान करुन सत्ता टिकवु शकते व बदलवु शकते. मतदान करताना सगळेच चांगल्या व्यक्तीला कौल देतात. पण शंभर टक्के चांगला किंवा शंभर टक्के वाईट कुणीही नसतो. त्यामुळे 'सगळ्यात चांगला' असलेल्या उमेदवारास पसंती देणे जास्त हिताचे ठरते. नोटा पर्यायाचा उपयोग करतानाही 'सर्वात चांगला' किंवा 'अव्हेइलेबल बेस्ट'चा विचार करुन कौल दिला पाहिजे. नाहीतर 'सर्वात वाईट' उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. मतदाराने याचा विचार करावा असेही ते म्हणाले.

देशाला परम वैभव संपन्न करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ज्यात सर्व सज्जन शक्ती एकवटली पाहिजे. आपलं लक्ष्य दूर नाही. केवळ विचार करत बसण्यापेक्षा काम करण्यास सुरुवात करावयास हवी. ध्येयाकडे वाटचाल सुरु करावयास हवी. स्वत: जागृत होऊन देशालाही जागृत आपणांस करायचे आहे, असे सांगुन डाॅ. भागवतांनी आपल्या वाणीस विराम दिला.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

कैलाशजींचे सत्यार्थी वचन

           कैलाशजींचे सत्यार्थी वचन

     विजया दशमी निमित्त नागपुर, रेशीमबागेतील रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अनेक महत्वाच्या मुद्यांना हात घालत सत्यार्थींच्या भाषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आपल्या जीवनातील काही अनुभव मांडतांना त्यांनी कश्याप्रकारे बालकांवरील अत्याचाराविरोधात मोहिम चालवली त्याचे वर्णन ते करत होते. जगभरात सर्वत्र बालकांवर अत्याचार होत होते, परंतु कुठेच त्याविरोधात आवाज उठवला जात नव्हता. आपल्या भारतात त्याविरोधात माझ्यारुपाने सुरुवात झाली. माझा श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेवर पुर्ण विश्वास आहे व त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. हे महान कार्य साक्षात परमेश्वरानेच माझ्याकडून करुन घेतले व भारताच्या पुण्यपावन भूमीमुळेच याची सुरुवात भारतात झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बालरोजगाराबाबत बोलताना सत्यार्थी म्हणाले, गेल्या वीस वर्षात बालमजुरीचे प्रमाण २६ कोटीवरुन १५ कोटीपर्यंत कमी झाले. यात भारतानेही खूप प्रगती केली आहे. परंतु आजही देशात बाल अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक आहे. आम्ही सोडवुन आणलेले अनेक बालके आपल्या घरी व माता पित्यांकडे जाताना उदास असतात. कारण त्यांच्या हातुन आजपर्यंत जे वाईट कामे झाली त्यामुळे आपण अपवित्र झाले असल्याची भावना त्यांच्या मनात असते. यासाठी समाजानेही अश्या बालकांकडे सकारात्मतेने व स्नेहपुर्ण भावनेने पहावे अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

     उत्सव सुरु होताना 'स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना' या सांघिक गीतामुळे सत्यार्थी फार प्रभावित झाले. त्याविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले, की भारतात शेकडो समस्या आहेत परंतु, भारतात समस्यांवरील अरबो उपायही आहेत. भारतात असे अरबो लोक आहेत जे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील असंख्य समस्यांचे उपाय जाणतात, ही अभिमानास्पद बाब आहे.

     आमच्या लहाणपणी घरी 'सत्यनारायण' व 'श्रीरामचरितमानस' कथेचा कार्यक्रम असे. तेव्हा आमची आई गायीच्या दूध व गोमुत्रापासुन बनविलेले पंचामृत आम्हाला देत असे. गायीला खाऊ घातल्याशिवाय घरात कुणीही जेवायला सुरुवात बसत नसे. असे सांगत आपल्या घरातील पवित्र वातावरणाचा उल्लेख करताना सत्यार्थींचे स्वर आनंदाने भारावले गेले होते.

     सत्यार्थींच्या संपुर्ण भाषणातील सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मांडलेले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संवेदनशील भारत, समावेशी भारत, सुरक्षीत भारत, स्वावलंबी भारत व स्वाभीमानी भारत ही पाच 'पंचामृत तत्वे'.

     संवेदनशीलता ही भारताची ताकद असल्याचे सांगताना जगात वेगाने होणारी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहता माणुस एकांगी व उपभोक्तावादाकडे वळत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु अश्या परिस्थितीतही जगाला समाधान व सौख्याचा मार्ग केवळ पुण्यपवित्र भारतच दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     समावेशी तत्व समजावुन सांगतांना त्यांनी सांगितले की समावेशकता भारताचे सौंदर्य आहे व त्याचे 'सहिष्णुता' व 'परस्पर सन्मान' हे आधारस्तंभ आहे. भारतात अनेक जाती पंथ आहेत, अनेक विचारप्रणाली आहे, अनेक भाषा आहे व ही भारताची एक ताकद आहे. ऋग्वेदाच्या ओवींचे प्रमाण देत भारतातील ग्रंथ व ऋषीमुनी आपणांस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश देतात. हा समावेशकतेचा संदेश असतो. ज्यामुळे भारताची स्वत:ची अशी ओळख निर्माण झाली आहे.

     भारताचे वीर जवान देशाची सुरक्षा करतात ज्यामुळे आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. परंतु, देशातील अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची अाहे. देशात बाल व बालिका सुरक्षीत नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला. भारत माँ दुर्गेचा व लक्ष्मीचा शक्तीशाली देश आहे. परंतु आजकाल देशातील अल्पवयीन मुलांच्या हातातील मोबाईल त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. धर्माच्या नावाखाली चालणा-या संस्था बालकांचा व बालिकांचा व्यापार करतात  व ही बाब गंभीर आहे, असेही ते म्हणाले. यावरून चर्चमधील व ख्रिश्चन धर्मादाय संस्थांमधील नुकतेच उघडकीस आलेले प्रकरणे किती गंभीर आहेत, याची कल्पना येऊ शकेल. देशात पाॅर्नोग्राफीने तरुणांच्या चारित्र्याला बिघडवण्याचा धुमाकूळ घातला असुन त्याविरोधात सामाजिक कार्यातुन व कायद्याच्या माध्यमातुन कसा अंकुश लावता येईल, याचे प्रयत्न आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.

     मागील वर्षी जम्मूकश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 'सुरक्षित बचपन, सुरक्षीत भारत'  अशी जनजागृती करणारी यात्रा काढली होती. या यात्रेला गावोगावी संघाच्या स्वयंसेवकांनी जो प्रतिसाद दिला व सरसंघचालक मोहनजी भागवतांनी जो संदेश पाठवला त्याबद्दल सत्यार्थींनी आभार व्यक्त केले.

     स्वावलंबी भारतविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले की केवळ विदेशी मदतीच्या जोरावर व मोजक्याच मोठ्या उद्योगपतींच्या अधिक श्रीमंत होण्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार नाही. भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याला शेतकरी, लहान व्यापारी व मजुरवर्गाला सक्षम करावे लागेल. भारताच्या सनातन संस्कृतीचे शाश्वतता, सार्वभौमिकता व समग्रता हे तीन पैलू आहेत. त्यामुळे देशाला सनातन संस्कृती लाभली व हेच भारताचे वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच आपल्यात स्वाभीमान जागृत होत असल्याचे त्यानी नमूद केले.

     आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी देशातील तरुणांसाठी आपणांस कुणाचे याचक किंवा आलोचक होऊन चालणार नाही तर आपली संस्कृती टिकवुन तिच्यानुसार मार्गक्रमण करावे लागेल असा संदेश दिला. तसेच रा.स्व. संघातील युवकांना त्यांनी आपल्या देशभरातील शाखांच्या माध्यमातून आपल्या गावातील बालक व बालिकांवर अत्याचार न व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जावे असा आग्रह केला. देशभरातील गावागावात संघाचे स्वयंसेवक आहेत, शाखा आहेत. त्यांनी जर ह्या कामास हातभार लावला तर आपल्या देशातील बाल अत्याचार संपुष्टात येऊन एक अख्खी पीढी सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाला रामायणातील जांबुवंताची भूमिका पार पाडायची आहे व देशातील प्रत्येक हनुमंतास म्हणजेच युवकास जागृत करायचे आहे असा प्रेमळ संदेशही त्यांनी यावेळी दिला व आपल्या प्रेरणादायी भाषणाचा समारोप केला.

-कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

Wednesday 24 October 2018

आणि_त्याने_डोळे_उघडले

#आणि_त्याने_डोळे_उघडले

सोयगांवात नुकतीच घडलेली सत्य घटना.

दिवसभर शेतीचे काम करुन सोनवणे कुटूंबीय झोपी गेले होते. घरात आई आपल्या लेकराला जवळ घेऊन झोपली होती. सर्वत्र शांतता पसरली होती व शांततेवर रात्रीने ताबा मिळवलेला होता. पंख्याची तेवढी घरघर चालू होती. तेवढ्यात शांततेला भंग करत सहा वर्षाच्या साईचा रडण्याचा आवाज आला. त्याचा रडणं ऐकुन आईला लगेच जाग आली. साई डोळे चोळत उठुन बसला होता व मोठ्यानेच रडू लागला. 'दादा, मला चावलं' असं कानाला हात लावत काहीसं बडबडत होता. मंद लाईटच्या प्रकाशातच आईने त्याच्या कानाला हात लावुन पाहिला. हाताला काहीतरी ओलसर स्पर्शाचा आभास त्या माऊलीला झाला. त्या मंद उजेडातच तिने आपली बोटांकडे नजर फिरवली. आपल्या बोटांना रक्त?? रक्तासारखे काही तरी आपल्या बोटावर दिसत असल्याची तिला जाणवले. साईच्या रडण्यामुळे घरातली सगळीच मंडळी जागी झाली. साईच्या दादांनी म्हणजेच वडिलांनी लाईटाचं बटन दाबलं. आणि पाहता तो काय? त्या माऊलीच्या बोटावर खरंच पुसटसे रक्त दिसत होते. आणि ते पाहुन सा-यांच्या हृदयाचे ठोके वाढले. भीतीने चेहरे ग्रासले. दादांनीही साईच्या कानाजवळ पाहिले. साईच्या कानावर रक्ताचे बारीक दोन थेंबं त्यांच्या दृष्टीस पडली. कश्याचे असावे? काळजीयुक्त चेह-यांवर प्रश्नचिन्ह पडले. आणि डोक्यात विचार आला. सर्पदंश..? डोक्यात प्रश्न तरळला आणि भीतीपोटी सगळ्यांनी अख्खे घर पिंजुन काढले. पण काहीच दिसले नाही. शेवटी काहीतरी किंडं किटकुल चावलं असावं असा विचार करुन पुन्हा सारे निश्चिंत होऊन झोपु लागले. साई अजुनही रडत होता. आई त्याला कुरवाळत झोपवत होती. त्याचं रडणं कमी झालं. घर पुन्हा शांत झाले. साईच्या आईचा डोळा लागत होता. तेवढ्यात तिच्या हाताला काहीतरी थंड स्पर्श झाला. तिने डोळे खडकन उघडले व उठुन बसत साईच्या वडिलांना मोठ्याने आवाज दिला. त्यांनी दरवाज्यातुन सरपटत जाणारा सर्प पाहिला. आणि लाईट लावेपर्यंत क्षणार्धात तो नाहिसा झाला.

आता मात्र घरातील सगळेच घाबरले. साईच्या वडिलांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. साईची प्रकृती अजुनही ठिक होती, तो रडत होता पण त्याचा चेहरा सामान्य नव्हता. साईला सर्पदंश झाल्याचे त्यांना आता मान्य करावे लागले.  आईला तर रडू कोसळले. आजीही रडू लागली. पित्यालाही धक्का बसला होता. पण रडून चालणार नव्हते. त्यांनी गल्लीतील शेजा-यांना तात्काळ उठवले. शेजारपाजारची मंडळी जमली. आणि साईला रात्री दोन वाजता सोयगांवच्या ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे सारेजण घेऊन निघाले. भैरवनाथाच्या धावा करत झपाझप पावलं टाकत सारेजण त्या काळोख्या रात्री मंदिरात पोहचले. भैरवनाथाचे दर्शन झाले. तेथिल रक्षा साईच्या कपाळी लावली व सगळे पुन्हा घाई घाईतच घरी परतले.

साईची प्रकृती खालावत चालली होती. वैद्यकिय उपचारासाठी गावातीलच सरकारी दवाखान्यात त्याला नेण्यात आले. त्याची नाजुक स्थिती पाहता स्थानिक डाॅक्टरांनी प्रथमोपचार केले व लगेच जळगांवला एखाद्या चांगल्या क्रिटिकल केअर सेंटरला जाण्याचा सल्ला दिला. अवघ्या दहा मिनिटात रुग्णवाहिका डाॅक्टरांसमवेत तेथे हजर झाली. आणि जळगांवचा प्रवास सुरु झाला.

दादा आपल्या साईला मांडीवर घेऊन बसले होते. आई सारखी देवाकडे प्रार्थना करत होती. एकेक सेकंद तासासमान भासत होता. गाडी पहुरपर्यंत पोहचली. साई मान सोडू लागला होता. विष वेगाने त्याच्या शरीरात पसरत होते. शिवाय कानाला सर्पदंश झाल्यामुळे मेंदूपर्यंत कमी वेळेत वीष पोहचण्याचा धोका होता. अश्या परिस्थितीत काळजीने व्याकुळ वडिल एकसारखे त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. स्वत:चे मन समाधान करत होते. साई त्यांना होकार देत होता. गाडी नेरीजवळ पोहचली. तशी साईने मान सोडली. त्याला डोळेही उघडवेना झाले. वीषाने त्याच्या शरीरावर बराच कब्जा केला होता. पण वडिलांना अजुनही तो होकार देत होता. बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण पापण्या मात्र त्याने मिटल्या होत्या. एव्हाना रुग्णवाहिका जळगांवच्या सिव्हील हाॅस्पीटलजवळ येऊन थांबली होती. दवाखान्यात प्रवेश केला. डाॅक्टर भेटले. पण साईची नाजुक स्थिती पाहता त्यांनी त्याची शाश्वती घेता येणार नसल्याचे सांगितले. आम्ही सर्वतो प्रयत्न करु. पण तुम्हाला जर अन्य चांगल्या हाॅस्पीटलमध्ये न्यायचे असेल तर तुम्ही नेऊ शकता असा सल्लाही त्यांनी दिला. आता साईचे केवळ हृदयाचे ठोके चालू होते. वडिलांच्या आवाजाला त्याचा प्रतिसादही बंद झाला होता. सोबत आलेल्या गावकरी मित्रांनी तात्काळ मोबाईलवर काही नंबर फिरवले. जळगांवातील चांगल्यात चांगल्या क्रिटिकल केअर सेंटर्सना फोन लावले. अॅपेक्स हाॅस्पीटलच्या आयसीयु मध्ये जागा रिक्त होती. आणि क्षणाचाही विलंब न लावता साईला अॅपेक्समध्ये दाखल केले. इथेही डाॅक्टरांनी साईची गंभीर प्रकृती पाहुन त्यांना स्पष्ट केले की 'त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करु. तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. आता सारे त्याच्याच हाती आहे.' साईचा मृत्युशी संघर्ष चालूच होता.

गावात ही बातमी भल्या पहाटेच पसरली होती. सगळ्यांनाच काळजी वाटत होती. तिकडे डाॅक्टरांचे प्रयत्न सुरु होते व इकडे गावात सगळ्यांनी देवाजवळ प्रार्थना सुरु केली. कुणी जप जाप्य करत होतं, तर कुणी देव पाण्यात टाकले. कुणी गजानन बावन्नी घेत होतं, तर कुणी आपल्या कुलदैवतेपुढे साईसाठी पदर पसरत होतं. साईचा प्रतिसाद पाहता डाॅक्टरांनी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले, अन् आतापर्यंत खंबीरपणे आपल्या लेकरासाठी तळमळत असलेल्या बापाच्या अश्रुचा बांध फुटला. मित्रांच्याही डोळ्यात पाणी आले. मित्र त्यांना धीर देत होते.

साई पुर्णपणे बेशुद्धावस्थेत होता. अॅडमीट करुन बारा तास झाले तरी त्याला शुद्ध येईना. डाॅक्टरांशी सारखी विचारपुस होत होती. 'शेवटी डाॅक्टरांनी पुढील चोवीस तास तुम्ही आम्हाला काहीच विचारु नका. आम्ही जे करता येईल ते करत आहोत. तुम्ही फक्त आता देवाजवळ प्रार्थना करा. मुलगा जगला वाचला तर ती देवाची कृपा' असे उदगार काढले. मनात शंका कुशंकांचे आधीच काहुर उठले होते. नको नको ते वाईट विचार येत होते. त्यात अजुन चिंता वाढली. काय होणार नि काय नाही काही कळत नव्हते.

साईला बेशुद्धावस्थेत जाऊन आता तीस तास होत आले होते. पण त्याला शुद्ध आली नव्हती की प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा झाली नव्हती. पण डाॅक्टरांच्या ट्रीटमेंटला आता कुठेतरी यश येऊ लागले होते. कारण औषधांचा परिणाम रिपोर्टवर साफ दिसुन येत होता. त्यामुळे कुठेतरी आशेचा किरण दिसु लागला होता. डाॅक्टर त्याची केवळ शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. एकदा का तो शुद्धीवर आला की त्याचा अर्धा धोका टळला म्हणुन समजा. अश्यातच साईपर्यंत आवाजाच्या संवेदना पोहचतात का हे पाहण्यासाठी डाॅक्टरांनी त्याच्याशी गोड गोड बोलायला सुरुवात केली. नर्सेसही त्याच्याशी लाडीक स्वरात बोलत होत्या. 'आपल्याला फिरायला जायचंय, खाऊ खायचाय, आईसक्रिमही घ्यायचं मस्त मस्त' असं बोलत त्याच्या संवेदना व प्रतिसाद जाणुन घेण्यासाठी प्रयत्न मनापासुन करत होत्या. अश्यातच बोलता बोलता नर्सने त्याच्या वडिलांचे नाव उच्चारले न उच्चारले तोच त्याच्या बोटांची सुक्ष्म हालचाल झाली. बंद डोळ्याआड असलेल्या बुबुळांनी क्षणिक हालचाल केली. हे पाहुन नर्सला आनंदाश्चर्य वाटले. साई त्याच्या वडिलांना प्रतिसाद देतोय हे त्यांच्या लक्षात आले. नर्सने ताबडतोब त्याच्या वडिलांना बोलावुन घेतले.

जीवन मृत्युच्या लढाईतील आता अंतिम चरण सुरु होते. साईचे वडिल त्याच्या बेडजवळ सचिंत स्थितीत उभे होते. नर्सने त्यांना साईशी गोड गोड पण मोठ्याने बोलायला सांगितले. आयसीयु युनिटमधील सगळ्या पेशंटचेही लक्ष आता इकडेच लागुन होते. सगळे जणु जीव मुठीत घेऊन बसले होते. पुर्ण अवसान एकवटून त्या पित्याने आपल्या काळजाच्या तुकड्यास हाक दिली.

"साई...बेटा ऊठ. आपल्याला घरी जायचंय ना?"

त्या बापाच्या कंठातून निघालेले स्वर अदृश्यपणे हवेत तरंगत त्या लेकराच्या कर्णातून वाहत जात थेट त्याच्या मस्तिष्कावर आदळले. आणि मंदिरांमध्ये होणा-या प्रार्थना जणु फळास आल्या. डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आले.

'साईने खाडकन डोळे उघडले!'

सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पित्याचा आवाज ऐकुन साईने आपले केवळ नेत्रच उघडले नव्हते, तर पुन्हा ही सृष्टी तो बघत होता. त्याचा जणु पुनर्जन्मच झाला होता. साश्रू नयनांनी तो बालक आपल्या पित्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातुन घळघळा अश्रु गळत होते. पित्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते. सर्वत्र आनंद पसरला होता. काळजीयुक्त काळवंडलेले चेहरे हर्षोल्हासाने व समाधानाने अक्षरश: उजळून निघाले.

पण डाॅक्टरांसमोर अजुनही एक यक्ष प्रश्न होताच. साईला शुद्ध आली होती. पण स्मृती??
विषाचा परिणाम जर मेंदुवर झाला असेल तर त्याची स्मृती जाण्याचा धोका होता. म्हणुन डाॅक्टरांनी परीक्षणासाठी त्यास विचारले, " साई, बाळा हे तुझे पप्पा आहेत ना?" त्यासरशी त्याने किंचित होकारार्थी मान हलवली. आणि हाही धोका टळल्याचे समाधान झाले. त्या माता पित्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
डाॅ. माजीद खान यांनी तर ही 'ईश्वरी कृपा' असल्याची प्रतिक्रिया दिली. तिकडे गावातही सर्व आप्तेष्टांना आनंद झाला.

पुढील दोन दिवसात साईची प्रकृती पुर्ववत झाली.
त्या पित्याने हर्षयुक्त नयनांनी डाॅक्टरांचे हात जोडून आभार मानले. आणि प्रेमळ मायेने पेशंटची सेवाभावे काळजी करणा-या व आपल्या गोडवाणीतून पेशंटचा अर्धा आजार पळवुन लावणा-या तेथिल नर्सेसचेही अनंत आभार मानले. विज्ञानाला अध्यात्माची व अध्यात्माला विज्ञानाची जोड असली म्हणजे अशक्यप्राय वाटणारी गोष्टही शक्य करता येते, हे या घटनेने पुन्हा सिद्ध झाले.

©कल्पेश गजानन जोशी
lekhamrut.blogspot.com