Saturday 27 October 2018

विजयादशमी

विजयादशमी उत्सव:
पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे नागपुर रेशीमबागेतील भाषण

दि. १८ आॅक्टोबर, गुरुवार रोजी देशभरात विजया दशमी उत्सवाच्या प्रसंगी रा. स्व. संघाचा संपुर्ण देशभरात पथसंचलन व शस्त्रपुजनाचा कार्यक्रम पार पडला. नागपुरच्या रेशीमबागेतील नागपुर महानगराच्या उत्सव प्रसंगी पु. सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केवळ रेशिमबागेतील उपस्थितांसाठीच नव्हे, तर देशभरातील स्वयंसेवकांसाठी व नागरीकांसाठी उद्बोधनपर व्याख्यान दिले. तत्प्रसंगी नोबेल पुरस्कार विजेते श्री. कैलास सत्यार्थी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. तसेच के.जे. अल्फान्स, सिनियर डायरेक्टर स्टाफ सौदी अरबचे अन्वरजी अली, आळंदीचे राणोजी महाराज, विक्रमजी चुना, अरुणाचल प्रदेशातील 'भारत मेरा घर' उपक्रमातील बंधूभगिनी व पद्मश्री, संगित नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त उस्ताद रशीद खान आपली पत्नी सोहा खान यांच्यासह अतिथी म्हणुन उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस घोष, व्यायामयोग व दंडाचे प्रात्यक्षिक स्वयंसेवकांनी सादर केले. त्यानंतर महानगर संघचालकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विजयादशमी उत्सवाचे व शस्त्रपुजनाचे महत्व थोडक्यात सांगितले व आलेल्या सर्व अतिथी व नागरीकांचे सहृदय स्वागत केले. त्यानंतर प्रमुख अतिथी असलेल्या श्री कैलास सत्यार्थी यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना मार्गदर्शन करत भारताचे वैशिष्ट्य सांगतांना संवेदनशील भारत, समावेशी भारत, स्वावलंबी भारत, स्वाभीमानी भारत व सुरक्षीत भारत हे पंचामृत तत्व मांडले.

कार्यक्रमाचा समारोप पु. सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांच्या उदबोधनपर भाषणाने झाला. त्यावेळेस ते बोलत होते. "भारतातील लोकांच्या काही कमतरतांमुळे देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी राज्य केले. समाज आपल्या मुळ मार्गापासुन दूरावत गेला. परंतु श्री गुरुनानक यांनी पुन: आपल्या संस्कारातुन देशाला धर्माचरणाचा योग्य मार्ग दाखविला. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांशी दोन हात केले व सुभाषचंद्र बोस यांनी तर आपली स्वत:ची देशरक्षणासाठी विदेशी भूमीवर सेना तयार करत इंग्रजांना घाम फोडला होता. जालीयनवाला बागेत इंग्रज आपल्या सोबत काय व्यवहार करतिल, हे माहित असतानासुद्धा तिथे जाऊन इंग्रज सरकारच्या मुजोरपणाविरोधात आवाज उठवला व झालेल्या हत्याकांडात हौतात्म्य पत्करले. अध्यात्मिक शक्तीमुळे देशात अश्या अनेक घटना घडल्या ज्यामुळे परकियांना देश सोडण्यास भाग पडले." असे मत डाॅ. भागवत यांनी मांडले.

आजही भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या सत्ता बदलतात किंवा कायम राहतात. परंतु, त्यांच्याकडून भारताला असलेला धोका कायम असतो. सत्ता बदलल्या म्हणुन देशाचे वर्तन बदलत नसते. नाहीतर जम्मू कश्मीरसह सीमावर्ती भागात होणारे शस्त्रसंधी उल्लंघन व गोळीबार थांबला असता. म्हणुनच आपणांस देशरक्षणार्थ सदैव तत्पर राहण्याची गरज आहे. शत्रुवर आपला दबदबा कायम राखण्यासाठी आपल्याला सदैव बलसंपन्न रहावं लागेल. जेणेकरून शत्रुची भारताकडे पाहण्याची हिंमत होणार नाही." असे मत मांडत डाॅ. भागवतांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

देशरक्षणासाठी भारताचे वीर जवान सीमेवर आपल्या कुटूंबापासून दूर रात्रंदिवस पहारा देत असतात. ते जवान त्यांचे कर्तव्य पार पाडताना कमी पडत नाही. पण एक नागरीक म्हणुन आपण आपले कर्तव्य का विसरतो? जवानांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी आपण घ्यावयास हवी व त्यांना शक्य ती मदत आपण केली पाहिजे. स्वत:च्या वैयक्तीक व कौटुंबीक कर्तव्यांशिवाय एक भारतीय म्हणुन असलेल्या कर्तव्यांचा समाजाला विसर कधीपासुन विसर पडू लागला? भारतीय समाजाने देश सरकारला कधीपासुन सोपवला? जे काही करायचे ते सरकारनेच, असा पायंडा पडत चालला आहे जो देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. ज्या परिवाराने आपल्या घरातील व्यक्ती देशासाठी सीमेवर पाठवली त्या परिवाराच्या प्रत्येक सुख दु:खात समाजाने मनापासुन सहभाग घेतला पाहिजे. समाजकर्तव्याची जाणिव करुन देणारा असा संदेशही डाॅ. भागवतांनी त्यावेळी दिला.

भारताला प्रचंड मोठी सागरी सीमा लाभली आहे. पश्चिम समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्रात शेकडो लहानमोठे द्वीप आहेत. ज्यांच्यावर आपले कायम लक्ष असले पाहिजे व त्यांचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी केला पाहिजे. भारताची वाढती शक्ती पाहता काही देश भारताविरोधात शेजारील लहानमोठ्या देशात आपले प्रस्थ जमवत आहेत. त्या अनुषंगाने भारताने सदैव कटीबद्ध राहुन सागरी सीमा अधिक सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे सांगत चीनपासुन देशाला असलेला धोका विषद केला.
भारताने आता नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करून स्वावलंबी व्हावयास हवे. शस्त्रांसाठी दुस-या देशांवर निर्भर राहण्यापेक्षा आपण स्वयंपुर्ण कसे होऊ याचा विचार झाला पाहिजे. स्वावलंबनताच देशाला आता जास्त सुरक्षित करु शकेल असे मत त्यांनी मांडले 

देशाला बाह्यशक्तींपासुन जसा धोका आहे तसाच अंतर्गत शक्तींपासुनही आहे. आंतरिक सुरक्षेस धोका निर्माण करणा-यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. तसेच त्यांना समर्थन करणा-यांचे कारणे शोधुन त्यावरही उपाय केला गेला पाहिजे. देशातील वंचित, शोषित व पीडितांना काही वाईट शक्तींकडून भडकवले जात आहे. या पीडितांचा वापर केवळ स्वत:चा स्वार्थ पुर्ण करण्यासाठी केला जात आहे. पीडित लोकांचे अश्या कामात देशविरोधी शक्तींना मदत करण्याचं कारण समजुन घ्यायला पाहिजे. देशातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहचतो का? यावर विचार झाला पाहिजे. देशविरोधी घोषणा देणा-या व बंदूकीच्या जोरावर क्रांती आणू पाहणा-यांना गरीब, दिन दलितांची व वनवासी बांधवांची काळजी कधीपासुन वाटू लागली? देशात आंतरीक सुरक्षेला आव्हान देणा-या घटना वाढत आहेत व त्यांचे करते करविते भारताबाहेर इटली, पाकिस्तान व अमेरिकेसारख्या देशात असणे अनेक शंका निर्माण करतात. ते देशवासीयांनी वेळीच ओळखले पाहिजे, असे ते म्हणाले.

आज सगळीकडे शहरी नक्षलवादावर चर्चा सुरु असतात. पण शहरी नक्षलवाद काल परवा जन्माला आला नसुन त्याची सुरुवात मागील ब-याच वर्षापासुन सुरु होती. सरकार कोणतेही असो पण त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या व नागरीकांच्या सुचनांचा विचार वेळीच केला तर भविष्यातील नक्षलवादासारख्या असुरी शक्ती डोके वर काढू शकणार नाही. छोट्या छोट्या संघटनांमार्फत, आंदोलनांमार्फत विद्यार्थ्यांना भडकावण्याचे माओवादी काम निरंतर चालू असते. विदेशात भारताची सतत निंदा करणारे देशातही 'भारत तेरे टुकडे होंगे' अश्या घोषणा देतात. हे एक प्रकारे मानसशास्त्रीय युद्ध चालू आहे. ज्याचं विद्रुप रूप दहा वीस वर्षानंतर दिसू लागते. म्हणुन भारतीयांनी सदैव सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे डाॅ. मोहनजी भागवत सांगत होते.

गरीब आदीवासी समाजाच्या मुलभूत गरजा पुर्ण झाल्यास ते देशविरोधी शक्तींना बळी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशाची आंतरीक सुरक्षा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस यंत्रणेला अत्याधुनिक करुन त्यांच्या योगक्षेमाचा विचार झाला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री कैलास सत्यार्थींनी स्वयंसेवकांना बाल व बालिकांवर होणा-या अत्याचाराविरोधात काम करण्याच्या केलेल्या आवाहनास आपल्या वाणीतून समाधानकारक उत्तर देताना मोहनजींनी स्वयंसेवक आपापल्या कार्यक्षेत्रात सदैव मदत करतील असा विश्वास व्यक्त केला.

बाल अत्याचार वाढत चाललेल्या परिस्थितीवर बोलताना डाॅ. मोहनजी भागवत म्हणाले, "बालकांवर आपल्या घरातुनच चांगले संस्कार मिळणे गरजेचे आहे. आजकाल बालकांना चांगले संदेश मिळणा-या बोधकथा सांगणे फार कमी झाले आहे. नवीन पीढीस सुसंस्कार, सदविचार देणे महत्वाचे आहे. हातातील मोबाईल फोन केवळ यंत्र आहे, त्याचा सदुपयोग कसा करावा हे केवळ त्या वापरकर्त्याच्या संस्कारावर अवलंबुन आहे. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार कमी करायचे असतिल तर केवळ कायदे करुन चालणार नाही, तर समाजमन बदलणे जास्त आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले."

देशाची अखंडता व सार्वभौमता टिकुन राहण्यासाठी 'बंधूता' फार महत्वाची आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान समर्पित करताना बंधूतेच्या तत्वाचे महत्व पटवुन दिले आहे. देशातील बंधूतेला तडा गेला म्हणजे देशविरोधी शक्तींचे फावते. तसे न होऊ देण्यासाठी डाॅ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या बंधुत्वाचा विसर पडता कामा नये. असे झाल्यास कितीही मोठी देशविरोधी शक्ती देशाचं काही बिघडवू शकणार नाही असा विश्वास डाॅ. भागवतांनी व्यक्त केला.

काळानुरुप होणारे परिवर्तन समाजाने स्विकार केलेले पाहिजे. नाहीतर समाजात अशांती व अस्थिरता निर्माण होते, हे केरळच्या शबरीमाला मंदिराच्या प्रकरणाचे उदाहरण देऊन डाॅ. भागवतांनी पटवुन दिले. न्यायालयाने दिलेला निर्णय स्त्री-पुरुष समानता जोपासणारा आहे. पण लाखो लोकांची श्रद्धा काय आहे, याचा विचार न करता हा निर्णय दिला. म्हणुन वाद निर्माण झाला. न्यायाच्या संबंधित बाबी जश्या न्यायालयाद्वारा न्यायसंमत होतात, त्याचप्रमाणे धर्माच्या बाबतीत असलेल्या बाबी धर्मगुरु किंवा आचार्यांकडून धर्मसंमत होतात. न्यायालयाद्वारे शबरीमालाचा निर्णय समाजावर थोपवला गेला म्हणुनच केरळमध्ये अशांती निर्माण झाली आहे. प्रबोधन करुन जोपर्यंत समाजमन बदलत नाही तोपर्यंत असे धाडसी निर्णय अस्थिरता व अशांतीला निमंत्रण देणारे ठरतात. असे मत डाॅ. मोहनजी भागवतांनी मांडले.

देशातील सर्वात संवेदनशील मुद्द्यापैकी एक असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिराबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, "बाबर एक आक्रमक होता. त्याला भारतातील हिंदू व मुसलमानांविषयी प्रेम व स्नेह नव्हते. भारताला लुटण्यासाठीच तो जर चालुन आला होता, तर त्याच्या आठवणीचं प्रतिक असलेल्या बाबरी मशिदला का जपावे? आता तर सिद्ध झाले आहे की तिथे पुर्वी मंदिरच होते व मंदिर पाडून मशिद उभारली गेली होती. परंतु काही लोकांना मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आहे, त्यामुळे ते काही ना काही कारण पुढे करत वेळ मारुन नेतात. देशातील हिंदु समाज कित्येक वर्षापासुन भव्य राममंदिर तयार होण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलनाचे सहयोगी संघटन म्हणुन आमची इच्छा आहे की सरकारने कायदा बनवुन अयोध्येत भव्य राममंदिर त्वरीत उभारावं."

मतदान व नोटाविषयी बोलताना डाॅ. भागवत म्हणाले की मतदानाचा अधिकार म्हणजे जनतेला मिळालेलं सर्वात मोठं शस्त्र आहे. जनता मतदान करुन सत्ता टिकवु शकते व बदलवु शकते. मतदान करताना सगळेच चांगल्या व्यक्तीला कौल देतात. पण शंभर टक्के चांगला किंवा शंभर टक्के वाईट कुणीही नसतो. त्यामुळे 'सगळ्यात चांगला' असलेल्या उमेदवारास पसंती देणे जास्त हिताचे ठरते. नोटा पर्यायाचा उपयोग करतानाही 'सर्वात चांगला' किंवा 'अव्हेइलेबल बेस्ट'चा विचार करुन कौल दिला पाहिजे. नाहीतर 'सर्वात वाईट' उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढते. मतदाराने याचा विचार करावा असेही ते म्हणाले.

देशाला परम वैभव संपन्न करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ज्यात सर्व सज्जन शक्ती एकवटली पाहिजे. आपलं लक्ष्य दूर नाही. केवळ विचार करत बसण्यापेक्षा काम करण्यास सुरुवात करावयास हवी. ध्येयाकडे वाटचाल सुरु करावयास हवी. स्वत: जागृत होऊन देशालाही जागृत आपणांस करायचे आहे, असे सांगुन डाॅ. भागवतांनी आपल्या वाणीस विराम दिला.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

No comments:

Post a Comment