Wednesday 17 October 2018

विजयादशमी : विजयोत्सव

विजयादशमी : विजयोत्सव

      आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येत असतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला 'विजया दशमी' असेही म्हणतात. दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव  अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस होता. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला होता. तसेच, पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते.

      फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती. त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, “मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन.” ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यावयाचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.

      कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला. परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. यावर युक्ती काढून इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.

      रघुराजाने ती सर्व नाणी कौत्सास दिली. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु त्यांनी फक्त १४ कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास परत दिल्या. त्या त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

      असा हा दसरा सण ज्याला आपण विजया दशमीही म्हणतो. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस. विजयाचं प्रतिक म्हणुन त्याकडे पाहिले जाते. म्हणुनच दसरा सणाला सिमोल्लंघनाचेही महत्व आहे. पुर्वी भारतातील असलेल्या सप्त बंद्यांपैकी एक बंदी सिंधूबंदी किंवा सागरबंदी होती. सिंधू नदी ओलांडून जाणे किंवा आपल्या देशाची सिमा ओलांडून जाण्यावर बंदी असे. त्यामुळे अनेक लढायांमध्ये भारतीय शुरवीरांनी केवळ सिंधूपर्यंतच शत्रुला पिटाळून लावले आहे. सिंधूपल्याड जाण्यास प्रतिबंध होता. परंतु या बंद्या राष्ट्रहितासाठी हानीकारक आहेत व त्या उखाडून फेकल्याशिवाय देश सुरक्षित राहणे कठीण होते.  म्हणुनच या बंद्यांमधून मुक्तीसाठी श्री रामचंद्रांनी सागर ओलांडून रावणाचा वध केला होता, याचा विचार करावा लागतो.

      कालांतराने हा सिंधूबंदीचा विचार नामशेष होत गेला. स्वातंत्र्य संग्रामातील स्वा. सावरकर, डाॅ. अॅनी बेझंट, श्यामजी कृष्ण वर्मा, गदर चळवळीचे नेते खानखोजे, काशीराम व लाला हरदयाळ सारखे अनेक नेते विदेशातुन ब्रिटिशांविरुद्ध सुत्र हलवित होते. याच पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते, की नेतांजींनीही ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन भारताबाहेर पलायन केले होते. शिवाजी महाराजांची आग्र्याहून झालेल्या सुटकेचा प्रसंग त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला होता. त्याच नेताजींनी आपल्या आझाद हिंद सेनेसह चालुन येऊन ब्रिटिशांना घाम फोडला होता.

      अगदी अलिकडील काही घटनांचा विचार केल्यास लक्षात येते की मागील दोन तीन वर्षात भारताच्या वीर जवानांनी म्यानमारच्या हद्दीत घुसुन आतंकवाद्यांचा खात्मा केला होता. ‌तसेच पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन उरी हल्ल्याचा प्रतिशोध घेत ४९ आतंकवाद्यांना यमसदनी धाडले होते. भारतीयांसाठी या घटना सदैव प्रेरणादायी ठरतात व त्यांचा उत्सव विजया दशमीच्या स्वरुपात साजरी केला जातो. म्हणुनच त्या दिवशी केल्या जाणा-या शस्त्रपुजनाचे अनन्य साधारण महत्व असते. म्हणुनच विजयादशमी उत्सव ख-या अर्थाने विजयोत्सव म्हणुवच साजरी होत असतो.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

1 comment:

  1. Is Casino & Sportsbook legal in Nevada? - DrMCD
    Is 바카라 사이트 큐어 벳 casino & 경기도 출장안마 sportsbook legal in Nevada? · MGM Resorts is an independently owned 강원도 출장안마 and managed 목포 출장안마 gambling brand that was acquired in 1996. · Caesars Entertainment is the parent company 시흥 출장샵

    ReplyDelete