Saturday 27 October 2018

कैलाशजींचे सत्यार्थी वचन

           कैलाशजींचे सत्यार्थी वचन

     विजया दशमी निमित्त नागपुर, रेशीमबागेतील रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना अनेक महत्वाच्या मुद्यांना हात घालत सत्यार्थींच्या भाषणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आपल्या जीवनातील काही अनुभव मांडतांना त्यांनी कश्याप्रकारे बालकांवरील अत्याचाराविरोधात मोहिम चालवली त्याचे वर्णन ते करत होते. जगभरात सर्वत्र बालकांवर अत्याचार होत होते, परंतु कुठेच त्याविरोधात आवाज उठवला जात नव्हता. आपल्या भारतात त्याविरोधात माझ्यारुपाने सुरुवात झाली. माझा श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेवर पुर्ण विश्वास आहे व त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. हे महान कार्य साक्षात परमेश्वरानेच माझ्याकडून करुन घेतले व भारताच्या पुण्यपावन भूमीमुळेच याची सुरुवात भारतात झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बालरोजगाराबाबत बोलताना सत्यार्थी म्हणाले, गेल्या वीस वर्षात बालमजुरीचे प्रमाण २६ कोटीवरुन १५ कोटीपर्यंत कमी झाले. यात भारतानेही खूप प्रगती केली आहे. परंतु आजही देशात बाल अत्याचाराचे प्रमाण चिंताजनक आहे. आम्ही सोडवुन आणलेले अनेक बालके आपल्या घरी व माता पित्यांकडे जाताना उदास असतात. कारण त्यांच्या हातुन आजपर्यंत जे वाईट कामे झाली त्यामुळे आपण अपवित्र झाले असल्याची भावना त्यांच्या मनात असते. यासाठी समाजानेही अश्या बालकांकडे सकारात्मतेने व स्नेहपुर्ण भावनेने पहावे अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली.

     उत्सव सुरु होताना 'स्वयं अब जागकर हमको, जगाना देश है अपना' या सांघिक गीतामुळे सत्यार्थी फार प्रभावित झाले. त्याविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले, की भारतात शेकडो समस्या आहेत परंतु, भारतात समस्यांवरील अरबो उपायही आहेत. भारतात असे अरबो लोक आहेत जे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील असंख्य समस्यांचे उपाय जाणतात, ही अभिमानास्पद बाब आहे.

     आमच्या लहाणपणी घरी 'सत्यनारायण' व 'श्रीरामचरितमानस' कथेचा कार्यक्रम असे. तेव्हा आमची आई गायीच्या दूध व गोमुत्रापासुन बनविलेले पंचामृत आम्हाला देत असे. गायीला खाऊ घातल्याशिवाय घरात कुणीही जेवायला सुरुवात बसत नसे. असे सांगत आपल्या घरातील पवित्र वातावरणाचा उल्लेख करताना सत्यार्थींचे स्वर आनंदाने भारावले गेले होते.

     सत्यार्थींच्या संपुर्ण भाषणातील सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मांडलेले भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संवेदनशील भारत, समावेशी भारत, सुरक्षीत भारत, स्वावलंबी भारत व स्वाभीमानी भारत ही पाच 'पंचामृत तत्वे'.

     संवेदनशीलता ही भारताची ताकद असल्याचे सांगताना जगात वेगाने होणारी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती पाहता माणुस एकांगी व उपभोक्तावादाकडे वळत जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. परंतु अश्या परिस्थितीतही जगाला समाधान व सौख्याचा मार्ग केवळ पुण्यपवित्र भारतच दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     समावेशी तत्व समजावुन सांगतांना त्यांनी सांगितले की समावेशकता भारताचे सौंदर्य आहे व त्याचे 'सहिष्णुता' व 'परस्पर सन्मान' हे आधारस्तंभ आहे. भारतात अनेक जाती पंथ आहेत, अनेक विचारप्रणाली आहे, अनेक भाषा आहे व ही भारताची एक ताकद आहे. ऋग्वेदाच्या ओवींचे प्रमाण देत भारतातील ग्रंथ व ऋषीमुनी आपणांस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा संदेश देतात. हा समावेशकतेचा संदेश असतो. ज्यामुळे भारताची स्वत:ची अशी ओळख निर्माण झाली आहे.

     भारताचे वीर जवान देशाची सुरक्षा करतात ज्यामुळे आपण स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. परंतु, देशातील अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची अाहे. देशात बाल व बालिका सुरक्षीत नसल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला. भारत माँ दुर्गेचा व लक्ष्मीचा शक्तीशाली देश आहे. परंतु आजकाल देशातील अल्पवयीन मुलांच्या हातातील मोबाईल त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. धर्माच्या नावाखाली चालणा-या संस्था बालकांचा व बालिकांचा व्यापार करतात  व ही बाब गंभीर आहे, असेही ते म्हणाले. यावरून चर्चमधील व ख्रिश्चन धर्मादाय संस्थांमधील नुकतेच उघडकीस आलेले प्रकरणे किती गंभीर आहेत, याची कल्पना येऊ शकेल. देशात पाॅर्नोग्राफीने तरुणांच्या चारित्र्याला बिघडवण्याचा धुमाकूळ घातला असुन त्याविरोधात सामाजिक कार्यातुन व कायद्याच्या माध्यमातुन कसा अंकुश लावता येईल, याचे प्रयत्न आम्ही करत आहोत असे त्यांनी सांगितले.

     मागील वर्षी जम्मूकश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत 'सुरक्षित बचपन, सुरक्षीत भारत'  अशी जनजागृती करणारी यात्रा काढली होती. या यात्रेला गावोगावी संघाच्या स्वयंसेवकांनी जो प्रतिसाद दिला व सरसंघचालक मोहनजी भागवतांनी जो संदेश पाठवला त्याबद्दल सत्यार्थींनी आभार व्यक्त केले.

     स्वावलंबी भारतविषयी बोलताना सत्यार्थी म्हणाले की केवळ विदेशी मदतीच्या जोरावर व मोजक्याच मोठ्या उद्योगपतींच्या अधिक श्रीमंत होण्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार नाही. भारत कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याला शेतकरी, लहान व्यापारी व मजुरवर्गाला सक्षम करावे लागेल. भारताच्या सनातन संस्कृतीचे शाश्वतता, सार्वभौमिकता व समग्रता हे तीन पैलू आहेत. त्यामुळे देशाला सनातन संस्कृती लाभली व हेच भारताचे वैशिष्ट्य आहे व त्यामुळेच आपल्यात स्वाभीमान जागृत होत असल्याचे त्यानी नमूद केले.

     आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी देशातील तरुणांसाठी आपणांस कुणाचे याचक किंवा आलोचक होऊन चालणार नाही तर आपली संस्कृती टिकवुन तिच्यानुसार मार्गक्रमण करावे लागेल असा संदेश दिला. तसेच रा.स्व. संघातील युवकांना त्यांनी आपल्या देशभरातील शाखांच्या माध्यमातून आपल्या गावातील बालक व बालिकांवर अत्याचार न व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जावे असा आग्रह केला. देशभरातील गावागावात संघाचे स्वयंसेवक आहेत, शाखा आहेत. त्यांनी जर ह्या कामास हातभार लावला तर आपल्या देशातील बाल अत्याचार संपुष्टात येऊन एक अख्खी पीढी सुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाला रामायणातील जांबुवंताची भूमिका पार पाडायची आहे व देशातील प्रत्येक हनुमंतास म्हणजेच युवकास जागृत करायचे आहे असा प्रेमळ संदेशही त्यांनी यावेळी दिला व आपल्या प्रेरणादायी भाषणाचा समारोप केला.

-कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

No comments:

Post a Comment