Saturday 13 October 2018

सोयगांवातील संघ स्मृती...

सोयगांवातील संघ स्मृती...

संघ सरिता या स्मृती ग्रंथातील सोयगावातील संघ इतिहास वाचुन अाज अक्षरश: भारावल्यागत झाले. १९७० च्या आसपास झालेले संघाचे बीजारोपण आज सोयगांवातील संघाचे वटवृक्ष होताना दिसत आहे. आजपासुन जवळजवळ पन्नास वर्षापुर्वीपासुन कित्येकांनी त्याग व समर्पणनाची परिकाष्ठा केली, तेव्हा कुठे आज आमच्या पीढीला संघ खुल्या मनाने व निडरतेने समजुन घेता येतो व संघसेवाही करता येते.

सोयगांवात संघाचं हे बीजारोपण होताना दादा लाड व सुधाकरराव नेवपुरकर या प्रचारकांसोबत हळद्याचे दत्तोपंत हळदेकर, अप्पा कापरे, राजा भैय्या, शांतारामअण्णा देसाई, सारंग मापारी, मधुकर मापारी, हरीभाऊ चौधरी, राम पठाडे व उत्तम थोरात असे काही स्वयंसेवक उभे ठाकले होते. त्यांच्या त्याग, समर्पण व मेहनतीमुळे सोयगांव तालुक्यात संघ वाढण्यास मदत झाली.

सर्वदूर संघविरोधी व काँग्रेसी वातावरणात संघाची शाखा लावणे सोपे काम नव्हते. सोयगांवात तर काँग्रेसचेच राज्य होते. त्यामुळे शाखा लावण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागे. प्रचारकांसह गावातील स्वयंसेवकही लपुन छपुन संघकार्य करत. शाखा लावत. संघाच्या गुप्त बैठका घ्याव्या लागत. ब-याच स्वयंसेवकांचे वडिल काँग्रेसी विचारांचे असल्यामुळे त्यांना संघाचं काम करताना फार विरोध होत असे. पण काही तरी बहाणे सांगुन तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा दिवस घराबाहेर राहुन संघ काम केलं. वातावरण संघानुकुल नसल्यामुळे  हळद्याहुन प्रचारक दिवसा येणे टाळत असत. त्यामुळे त्यांना रात्री बेरात्री प्रवास करावा लागे व सकाळी उजाडायच्या आत पुन्हा परत मुक्कामाच्या ठिकाणी जावे लागे.

सोयगांव तालुका सुरुवातीस जळगांव जिल्ह्यास (संघदृष्ट्या) जोडलेला असल्यामुळे शेंदुर्णीहुन डिगंबर बारी हे सोयगांवला कधी पायी तर कधी बैलगाडीत प्रवास करत येत असत व शाखा लावत असत. डिगंबर बारी आज हयात नाहीत. पण त्यांच्या जुन्या आठवणी ऐकताना अंगावर शहारे आल्याविना राहत नाही. शेंदुर्णीच्या उत्तम थोरातांनीही सोयगांवला प्रवास केले आहेत. एकदा प्रवास करताना डिगंबर बारी व उत्तम थोरात वादळी पावसात सापडले होते. दोघेही शेंदुर्णीहुन पायी निघाले होते. पावसात अंग भिजले होते. तरीही त्यांनी सोयगांव गाठलेच. पण अर्ध्या वाटेतुन परत फिरले नाही. सोयगांवला येऊन दोघांनीच संघस्थानावर प्रार्थना म्हंटली व ध्वजप्रणाम घेतला. नंतर एका पत्र्याच्या शेडखाली त्यांनी आसरा घेतला होता. थंडीने कुडकुडत होते. पावसात प्रचंड भिजलेल्या त्या दोन बालकांकडे पाहुन आमखेड्यातील एका हाॅटेलवाल्याला दया आली. त्याने दोघांना बोलावुन विचारपुस केली. ते दोघे संघाचे स्वयंसेवक आहे म्हंटल्यावर त्या हाॅटेलमालकाला धक्काच बसला. एवढ्या पावसात शेंदुर्णीहून फक्त शाखा लावायला हे दोघेजण आले याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याने दोघा बालकांना चहा दिला व लवकर निसटायला सांगितले. त्या हाॅटेलमालकाच्या डोळ्यातील त्या दोघी संघ स्वयंसेवकाकडे बघताना अभिमानाने आलेली चमक मात्र त्यांचा प्रवास सार्थकी करुन गेली. संघाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तो याचमुळे. हा अनुभव स्वत: उत्तमजींनी एकदा वार्तालाभ होत असताना सांगितला होता. तेव्हाच डोळे पाणावले होते.

आजही आम्हा स्वयंसेवकांना जुन्या आठवणी व किस्से ऐकायला मिळतात. या आठवणी आमच्यातील पेटलेल्या संघसेवेच्या नंदादीपास निरंतर तेवत ठेवतात. कारसेवेच्या वेळी गावातील निघालेले व आणीबाणीच्या काळात जेरबंद झालेले अनेक कार्यकरत्यांचे अनुभव ऐकताना ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. मागील चाळीस पन्नास वर्षात सोयगांवात संघाचे काम खूप वाढले. आज घराघरात स्वयंसेवक दिसतात, ते तेव्हाच्या स्वयंसेवकांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळेच. सर्व आठवणी कागदावर उतरवायच्या झाल्या, तर वेळ अपुरा पडेल इतक्या आठवणी आहेत. संघसरिता या स्मृती ग्रंथातील सोयगांवच्या आठवणी वाचताना आज ज्या वरीष्ठ स्वयंसेवकांसोबत काम करतो त्या राजु फुसे, बबन चौधरी, आत्मारामजी बावीस्कर, सुनिल गावंडे, आनंदा इंगळे सर, योगेश मानकर, योगेश सोन्ने, बंडू भाऊ व वैकुंठवासी भूषणदादा मिसाळ या सगळ्यांचे नाव वाचुन त्यांच्याविषयी मनातील आदरभाव अजुन शतपट वाढला आहे. कालच रामभाऊ पठाडे यांच्याघरी प्रचारकांसोबत प्रवास झाला. त्यांच्याकडून ब-याच आठवणी ऐकायला मिळाल्या. कधी अप्पा कापरे व शांताराम अण्णा यांच्याकडूनही आठवणी ऐकायला मिळतात. ही सर्व मंडळी आज पासष्टी ओलांडलेली आहे. पण त्यांनी जेव्हा त्या बिकट परिस्थितीत संघकार्य सुरु केलं तेव्हा त्यांचे वय वीसच्या आतचे होते. त्यामुळे त्या सर्व स्वयंसेवकांच्या त्यागाची व हिमतीची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. नाही का?

पन्नास वर्षापुर्वी सुरु झालेल्या शाखेवरील स्वयंसेवक काळानुसार बदलले. ते गेले दुसरे आले. कधी कमी झाले तर कधी वाढले. एवढेच काय तर संघाचा गणवेशही बदलला. पण संघस्थानावरील भगवा तसाच डौलात फडफडताना दिसतो व 'नमस्ते सदा वत्सले' या प्रार्थनेचे स्वर अजुनही वातावरणात त्यात लयबद्धतेत घुमतात. अजुनही भारतमातेचा जय घोष तितक्याच जोशपुर्ण आवाजात निनादत असतो...आणि स्वयंसेवकांच्या पावलांची मातीवर उमटलेली रांगोळी संध्याकाळच्या शांत शितल वातावरणात मातृभूचा साज श्रृंगार केल्यागत भासतात.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com

No comments:

Post a Comment